Sat, Jul 20, 2019 15:51होमपेज › Konkan › कोकण पदवीधरमध्ये भिडणार तीन ठाणेकर

कोकण पदवीधरमध्ये भिडणार तीन ठाणेकर

Published On: Jun 01 2018 8:00AM | Last Updated: Jun 01 2018 8:00AMठाणे :  खास प्रतिनिधी 

गोंदियामधील लोकसभेची पोटनिवडणूक जिंकल्याने मनोधैर्य वाढल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप अशा संयुक्त आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघातून एकच उमेदवार दिला जाईल. ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या पाहता भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाण्यातील उमेदवारांना पसंती दिलेली आहे. शिवसेनेतर्फे माजी महापौर संजय मोरे आणि राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला यांच्या उमेदवारीची लवकरच अधिकृत घोषणा होईल आणि पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा तिरंगी लढत पाहण्यास मिळेल. 

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. डावखरे हे भाजपचे उमेदवार असतील. त्यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून रायगडचे संपर्कप्रमुख तथा माजी महापौर संजय मोरे यांना रिंगणात उतरविण्यात येणार आहे. रत्नागिरीमधील भाजपच्या माजी आमदारावर निशाणा चुकल्यामुळे मोरे यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यांची उमेदवारी शुक्रवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

पक्ष सोडताना डावखरे यांनी आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप केल्यानंतर आव्हाड यांच्या भूमिकेकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे निरंजन यांच्या विजयाचे डाव खोटे पाडण्यासाठी आव्हाड समर्थकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यात माजी विरोधी पक्ष नेते नजीब मुल्ला यांचे नाव आघाडीवर आहे. या निवडणुकीमध्ये स्वाभीमानी पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षांच्या कामगिरीवर विजयीची सूत्र विसंबून आहेत.

या निवडणुकीत शेकापाची भूमिका फार महत्वाची ठरली आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी देण्यासंबंधीची चर्चाही सुरू आहे. त्या राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची कन्या देखील आहे. 

दिवसागणित राजकीय समीकरणे बदलत असल्याने राष्ट्रवादी ही जागा लढवेल आणि नजीब मुल्ला हे उमेदवार असतील, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये होणारी तिरंगी लढत ही ठाणेकरांमध्येच होईल असे चित्र समोर येत आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदार संघात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार आहेत. 

जवळपास 38 हजार मतदार असल्याने सर्व पक्षांकडून ठाण्यातील उमेदवारांना पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडून डावखरे यांची उमेदवारी निश्‍चित असून शुक्रवारी शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीकडून नंदकुमार मोगरे यांचे नाव चर्चेत?
कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे शहापूर तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे यांचे नाव देखील उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मोगरे यांनी स्वतः याबाबत आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे शहापूर तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे हे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा यांचे खंद्दे समर्थक म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यात व ग्रामीण भागात त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याचे तसेच मोगरे यांनी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या दोन्ही संघटनांची जिल्हा पदे भूषवली आहेत. याचा फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होणार असल्याची चर्चा आहे. कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी 7 जूनपर्यंत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत.