Sun, Mar 24, 2019 04:15होमपेज › Konkan › सिंधुदुर्गनगरीत आज किटली आंदोलन

सिंधुदुर्गनगरीत आज किटली आंदोलन

Published On: Jul 15 2018 10:55PM | Last Updated: Jul 15 2018 10:25PMकणकवली : प्रतिनिधी

गोवा, गुजरात, कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना चांगला दर द्यावा, राज्य शासनाने शासकीय डेअरी चालू करून दुधाला चांगला दर देत वाहतूक खर्च द्यावा, या आणि अशा विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे किटली आंदोलन सोमवारी (दि. 16) ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान केले जाणार आहे. सकाळी 10 वा. या आंदोलनास प्रारंभ होणार आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील सुमारे 5 हजार दूध उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडू, असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.

कणकवलीतील जिल्हा बँक शाखेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, या आंदोलनासाठी गेल्या काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि सोसायट्यांच्या बैठका घेतल्या. या सर्व बैठकांना शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व दूध उत्पादक व शेतकर्‍यांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे. दुधाच्या हमी भावाबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला नाही तर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर येतील. या आंदोलनात कुठेही दूध रस्त्यावर ओतले जाणार नाही. दूध हे अमृतासमान आहे. ज्या शेतकर्‍यांना शक्य आहे त्यांनी आपल्या किटलीतून दूध गरम करून घेवून यावे. शक्य नाही त्यांनी दुधाच्या किटल्या आणाव्यात, कारण दुधाची किटली हे लक्ष्मीचे प्रतिक आहे. शेतकरी शेतीबरोबरच गोठा बांधणीसाठी आणि दुधाळ जनावरांसाठी कर्ज घेतो. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेत या कर्जाचा समावेश करून शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी. शेतकर्‍यांनी अशा कारणांसाठी घेतलेले कर्ज शासनाने माफ करावे. भविष्यात सिंधुदुर्गातील शेतकरी स्वत:च्या पायावर उभा रहावा, यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी सांघिक भावना व एकजूट दाखविली नाही तर सरकारकडून मागण्या पदरात पाडून घेता येणार नाही. त्यामुळे एकजूट महत्त्वाची आहे.

सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्गात सोसायटी आणि दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या 55 सभा घेतल्या. जिल्ह्यात 125 दूध सोसायट्या कार्यरत आहेत. सुमारे 4 हजार शेतकरी त्यांना दूध घालतात. त्या सर्व शेतकर्‍यांनी यामध्ये सहभागी व्हावे. रवळनाथ मंदिर येथे स.10 वा. दुधाचा अभिषेक करून शेतकरी शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात, नजीकच्या शाळा, अंगणवाड्या, जिल्हा रूग्णालय, वृध्दाश्रम येथे दुधाचे वाटप केले जाणार असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.