Tue, Mar 19, 2019 20:57होमपेज › Konkan › लखनौच्या अधिवेशनात लोकमान्यांची सिंहगर्जना : चारूदत्त आफळेबुवा

लखनौच्या अधिवेशनात लोकमान्यांची सिंहगर्जना : चारूदत्त आफळेबुवा

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 9:08PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

राजद्रोहाच्या आरोपाखाली इंग्रजांनी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात धाडले. दरम्यानच्या काळात इंग्रजांविरोधात प्रचंड असंतोष वाढला. टिळक सुटल्यानंतर 1916 मध्ये लखनौमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात टिळकच आमचे खरे नेते आहेत, असा जनक्षोभ वाढला. लखनौला जाण्यासाठी प्रत्येक स्थानकावर आगगाडी थांबवून लाखो हिंदुस्थानी लोकांनी टिळकांना अभिवादन केले. टिळक मोटारीत बसले तर लोकांनी सर्व टायरची हवा काढली आणि जनतेने त्यांना बग्गी मध्ये बसण्यास सांगितले. मग बग्गीचे घोडे काढून कार्यकर्त्यांनी स्वतः बग्गी ओढली. जनतेकडून असा मान अखंड भारतात फक्त लोकमान्यांना मिळाला. याच अधिवेशनात त्यांनी ‘स्वराज्य, माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना केली, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळेबुवा यांनी केले.

‘कीर्तनसंध्या’ आयोजित कीर्तन महोत्सवाच्या पाचव्या व शेवटच्या कीर्तनात ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीकरांची गर्दी झाली. बुवा म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेतील लढा संपवून मोहनदास गांधी भारतात परतले होते. पहिल्या महायुद्धात इंग्रजांना विनाअट हिंदुस्थानी सैनिक मदत करतील, असा प्रस्ताव काँग्रेसने केला. त्यामुळे इंग्रज भारावून आपल्याला साम्राज्यातील सुराज्य देतील, असा अंदाज होता. इंग्रजांकडून काहीही मिळणार नाही, हे लोकमान्यांना माहित होते. त्यामुळे लोकमान्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. पण ठराव मंजूर झाला आणि अनेक कायदे इंग्रजांनी लादले. मालकाला न विचारता त्याची जमीन, पैसे सरकारजमा होऊ लागले. इंग्रजांच्या सैन्यात शिरा, लष्कर ताब्यात घ्या, म्हणजे खरे स्वराज्य मिळेल, असे टिळकांचे मत होते.

भारताचा विजय नजीक असला की दुर्दैवाने आपला नेता जातो. इतिहासकाळापासून हे आतापर्यंत दिसून आले आहे. स्वा. सावरकरांनी हिंदुस्थान जगाचे नेतृत्व करणारे राष्ट्र बनेल, अशी भविष्यवाणी केली होती. त्या दिशेने भारताचे प्रवास सुरू झाला आहे. हिंदुस्थानच्या नेत्याला सर्व हिंदूंनी जातपात न बघता पक्ष न बघता हिंदुस्थानी म्हणून पाठबळ द्यायला हवे, असे भावनिक आवाहन बुवांनी केले. तिसर्‍या महायुद्धात हिंदुस्थान वाचला पाहिजे म्हणून सार्‍यांनी व्यायाम, योगसाधना आणि बलवान व्हावे, अशी सूचनाही केली.

जोडोनिया धन, आधी लगीन कोंडाण्याचे, विजयाचा क्षण आला, अष्टविनायका तुझा महिमा, कृष्ण माझी माता, आदी पदे बुवांनी कीर्तनात सादर केली. बुवांना संगीतसाथ करण्यासाठी प्रख्यात पखवाजवादक राजा केळकर यांनी काल ढोलकी, दिमडी, संबळ, शंख, ढोल, अशी सहा वाद्ये आणली होती. या वाद्यांना खाद्य देण्याकरिता बुवांनी अष्टविनायक चित्रपटातील गीत पंधरा मिनिटे ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हेरंब जोगळेकर, प्रथमेश तारळकर, उदय गोखले, मधुसूदन लेले, आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई व आदित्य पोंक्षे यांची संगीतसाथही सुरेख मिळाली. निबंध कानिटकर यांनी निवेदन केले.

अ. भा. कीर्तन संमेलन रत्नागिरीत

दिल्लीच्या नाटक अकादमीवर आफळेबुवा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरील कीर्तन संमेलन घेण्याचा प्रस्ताव आल्यावर बुवांनी पुण्या-मुंबईऐवजी रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकण्याचे ठरवले. ‘कीर्तनसंध्या’ गेली सात वर्षे कीर्तन महोत्सवाचे यशस्वी नियोजन करत आहे. त्यामुळे बुवांनी कीर्तनसंध्याच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून अ. भा. संमेलन रत्नागिरीत घेऊ, असे दिल्लीमध्ये सांगितले. या संमेलनात बंगाली, आसामी, तमिळ अशा विविध भारतीय भाषांतील कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकरांना मिळेल, असे जाहीर केले.