Wed, Feb 20, 2019 09:06होमपेज › Konkan › खेर्डीचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात

खेर्डीचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 10:33PMचिपळूण : खास प्रतिनिधी

शहरानजीकच्या खेर्डी ग्रामपंचायतीमध्ये सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना खेर्डीचे ग्रामसेवक जितेंद्र रामचंद्र कांबळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी लावलेल्या सापळ्यात ते सापडले. याप्रकरणी कांबळे यांच्यावर गुरुवारी दुपारी 1.45 च्या सुमारास खेर्डी ग्रामपंचायतीजवळ ही कारवाई झाली. 

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पी. एम. कदम, बी. ए. तळेकर, संतोष कोळेकर, संदीप ओगले, विशाल नलावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

खेर्डी ग्रा.पं.ला येथील एकाने ग्रीड, मकिंग व जळावू लाकूड पुरविले होते. या बिलापोटी येथील ग्रामसेवक कांबळे यांनी संबंधिताकडे बिलाच्या रकमेचे दोन टक्के कमिशन मागितले होते. मात्र, तक्रारदाराला बिल मिळूनही त्याने कमिशन दिले नाही. दरम्यानच्या काळात संबंधित तक्रारदाराने खेर्डी ग्रा.पं.कडे काही माहितीसाठी माहिती अधिकाराचा अर्ज केला होता. मात्र, ग्रामविकास अधिकारी कांबळे त्यांना माहिती देत नव्हते. एके दिवशी तो ग्रा.पं.त गेला असता, कमिशनचे आठ हजार रुपये आणून दे. दोन दिवसांत माहिती देतो’ असे कांबळे यांनी सांगितले.

यानंतर तक्रारदाराने संबंधित ग्रामविकास अधिकार्‍याची लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार गुरुवारी दुपारी सापळा रचण्यात आला. ग्रामसेवकाने आठ ऐवजी सात हजारांवर तडजोड केली. गुरुवारी दुपारी 1.45 वा.च्या सुमारास संबंधित तक्रारदार खेर्डी ग्रा.पं.त आला व त्याने कांबळे यांना ठरल्याप्रमाणे सात हजार रुपये दिले. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याना रंगेहाथ पकडले.