Fri, Jul 19, 2019 07:42होमपेज › Konkan › बलात्कार करून शाळकरी मुलीचा खून

बलात्कार करून शाळकरी मुलीचा खून

Published On: Jul 20 2018 11:24PM | Last Updated: Jul 20 2018 10:26PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील सुकीवली परिसरातील अल्पवयीन  शाळकरी मुलीचा  सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय 29) या नराधमाने बलात्कार करून खून केल्याची घटना दि. 19 रोजी घडली आहे. खुनानंतर बालिकेचा मृतदेह घरामागील शौचालयाच्या टाकीमध्ये फेकून दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नराधमाने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याविरोधात ‘पोक्सो’अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अल्पवयीन मुलगी भरणेनाका येथील एका हायस्कूलमध्ये शिकते. गुरूवार दि.19 रोजी शाळा सुटल्यानंतर उशीरापर्यंत ती घरी आली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु,रात्री उशीरापर्यंत तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. यानंतर घरच्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार खेड पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी खेड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

यानंतर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी तिचा शोध घेतला. यानंतर वडिलांनी काहीजणांवर संशय व्यक्त केला. संशयीतांपैकी सूर्यकांत नवनाथ चव्हाण (29,रा.सुकीवली)याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न नातेवाईक करत होते. मात्र, तो समोर येण्यापासून टाळाटाळ करीत होता. यामुळे घटनेचा तपास करणारे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा संशय बळावला व त्यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन सूर्यकांतच्या घराची पाहणी केली असता बालिकेचे दप्तर, हेअर बॅण्ड, चप्पल व केसाचा चाप त्याच्या घरात सापडला. पोलिसांनी शुक्रवार दि.20 रोजी पहाटेच्या सुमारास सूर्यकांतला खेड बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपण तिला गुरूवार दि.19 रोजी सायंकाळी शाळेतून परत येताना आजोबा बोलावत असल्याचे सांगून आपल्या घरी नेले व तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याची कबुली दिली. यानंतर तिचा मृतदेह आपल्या घरामागील शौचालयाच्या टाकीत टाकल्याचे  सांगितले.

हा प्रकार उघड होताच संपूर्ण  पोलिस यंत्रणाच हादरली. पोलिसांनी तत्काळ सूर्यकांत  विरोधात पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा  दाखल करून त्याला अटक केली.  पोलिसांनी सूर्यकांतच्या  घराजवळ जाऊन  तिचा मृतदेह टाकीतून बाहेर काढला. त्यानंतर कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदान करण्यात आले. 

बालिकेचे अपहरण झाल्याचा गुन्हा गुरूवार दि.19 रोजी रात्री उशीरा खेड पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी काही तासांतच शुक्रवार दि.20 रोजी पहाटेच सूर्यकांत चव्हाणला अटक केली.