Sat, Dec 14, 2019 03:07होमपेज › Konkan › लोटेत पोलिसांकडून धरपकड सुरूच

लोटेत पोलिसांकडून धरपकड सुरूच

Published On: Jan 30 2019 1:33AM | Last Updated: Jan 30 2019 1:33AM
खेड : प्रतिनिधी

गोवंश हत्या संशयावरून पीरलोटे येथे झालेल्या उद्रेकामध्ये पोलिसांना मारहाण झाली. याप्रकरणी 25 संशयितांसह सुमारे तीनशे ते चारशे लोकांवर खेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मंगळवारी (दि. 29) आणखी चौघाजणांना अटक करण्यात आली आहे.

गोवंश हत्या व बेकायदा गुरांची वाहतूकप्रकरणी लोटे परिसरातील ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी रास्ता रोको केला. रस्त्यात बसलेल्या लोकांना हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. यानंतर उद्रेक होऊन जमावाने दगडफेक करीत पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पाच पोलिस जखमी झाले. जखमी पोलिसांना चिपळुणातील लाईफ केअर रुग्णालयातून सोमवारी उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. मात्र, आता गोवंश हत्या संशय प्रकरण बाजूला पडले असून पोलिसांनी उद्रेक करणार्‍या लोकांची धरपकड सुरू केली आहे.     

तिसर्‍या दिवशीही लोटेमध्ये पोलिस तैनात असून पोलिस घराघरांत जाऊन पसार झालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती मिळवली जात आहे. तसेच पाच पोलिस पथकांच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. 

मंगळवारी सकाळी या प्रकरणी सखाराम केशव मोरे (रा. लोटे तलारीवाडी), राजेंद्र सुरेश हळदे (रामपूर), अलंकार प्रदीप आंब्रे (चिरणी), सुनील महादेव कांगणे (काडवली) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत सहा संशयितांना अटक करण्यात आली असून पंधरा जणांची चौकशी सुरू आहे. दापोलीचे पोलिस निरीक्षक अनिल लाड या प्रकरणी तपास करीत आहेत. 

लोटेतील उद्रेक प्रकरणी खेड पोलिसांनी 22 जणांसह 300 संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अरुण चव्हाण, चंद्रकांत चाळके, मोहन आंब्रे, नाना चाळके, सचिन चाळके, सुरेश कडू, विष्णू आंब्रे, घाणेखुंटचे सरपंच अंकुश काते, रवी काते, सुरेशबुवा चाळके, राजेंद्र आंब्रे, जीवन आंब्रे, लोटेचे माजी सरपंच महेश गोवळकर, सुनील मोरे, सचिन काते, मंगेश चाळके, विजय आंब्रे, बाबू आंब्रे, शौर्य चाळके, मानाजी कडू, सचिन कडू, विनायक हुमणे, प्रवीण आंब्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर भारतीय दंड कायद्यानुसार 307 कलमप्रमाणेच तब्बल 22 कलमे लावण्यात आली आहेत.