Fri, Apr 26, 2019 09:26होमपेज › Konkan › उत्तर रत्नागिरीला पावसाने झोडपले

उत्तर रत्नागिरीला पावसाने झोडपले

Published On: Jul 07 2018 10:42PM | Last Updated: Jul 07 2018 10:42PMखेड : प्रतिनिधी

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवार (दि. 6) रोजीपासून ढगफुटीप्रमाणे कोसळणार्‍या मुसळधार पावसाने शनिवारी खेडमध्ये कहर माजवला. मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच कोकण रेल्वेची वाहतूकही सकाळपासून विस्कळीत झाली. रेल्वे मार्गावर दिवाणखवटीनजीक रूळावर 4 ते 5 फूट पाणी साचले तर मुंबई-गोवा महामार्गावर बोरघर, नातूनगर भागात रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचले. ग्रामीण भागातही रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण उत्तर रत्नागिरीतील दळण-वळण पूर्णतः ठप्प झाले.

उत्तर रत्नागिरीत खेड-दापोली मार्गावर एकवीरानगर येथे रस्त्यावर पाणी साचल्याने व पर्यायी मार्ग असलेल्या क्षेत्रपालनगर येथील खेड-शिवतर मार्गावरील पूल कमकुवत बनल्याने अवजड वाहतूक पूर्णतः रोखण्यात आली. पर्यायी मार्गही बंद झाल्याने तीन तालुक्यांचा संपर्क तुटला तर दुसर्‍या बाजूला जगबुडी व नारिंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी खेड बाजारपेठेत शिरल्याने दुकाने पाण्याखाली गेली. अचानक शहरात पुराचे पाणी शिरल्याने व्यापार्‍यांचे नुकसान झाले. यामुळे नदी काठावरील अनेकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले. 

शहरात पुराचे पाणी शिरल्याने बाजारपेठ जवळपास बंद, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  2005 नंतर पहिल्यांदाच पावसाचा रूद्रावतार दिसून आला. खेड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने संकट निर्माण केले आहे. मंगळवारपासून गुरूवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जगबुडी नदीने धोक्याच्या पातळीवरून वाहण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी एक दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला होता. परंतु, त्याच दिवशी रात्री ढगफुटीप्रमाणे पुन्हा मुसळधार पावसाला सुरवात झाली. परिणामी आधीच धोक्याची पातळी ओलांडलेल्या जगबुडी, नारिंगी व चोरद नद्यांनी रूद्रावतार घेतला. मुंबई-गोवा महामार्गावर बोरघर, उधळे या ठिकाणी चार ते पाच फूट पाणी महामार्गावर साचल्यामुळे महामार्ग ठप्प झाला होता. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने महामार्गावरून जाणार्‍या अनेक गाड्या पुराच्या पाण्यात अडकून पडल्या. ग्रामस्थ, पोलिस व मदत ग्रुपच्या सदस्यांनी वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचवले.
कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी रेल्वे स्थानकादरम्यान रूळावर 4 ते 5 फूट पाणी साचल्याने रेल्वे मार्गावरील वाहतूक  सकाळी 11 नंतर बंद करण्यात आली. त्यामुळे दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, खेड, आंजणी, चिपळूण ते रत्नागिरीपर्यंत सर्व स्थानकांमध्ये पॅसेंजर व एक्स्प्रेस ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेतील प्रवासी तासनतास रखडले होते. महामार्ग बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महामार्गही बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना जिथल्या तेथे थांबण्याशीवाय पर्याय नव्हता. पावसामुळे तासनतास रखडलेल्या पॅसेजर व एक्स्प्रेस गाड्यांतील प्रवाशांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. 

तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख जिल्हा मार्ग अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने ठप्प झाले होते. बहिरवली खाडीपट्ट्यात जाणार्‍या मार्गावर सुसेरी गावानजीक रस्त्यावर  नारिंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी साचल्याने खाडीपट्ट्यातील गावांचा संपर्क तुटला. तसेच खेड-चिंचघर मार्गावरही नारिंगी नदीचे पाणी आल्याने चिंचघर प्रभूवाडी व तिसे गावांचा संपर्क तुटला होता.
खेड-कोंडिवली मार्गावर अलसुर गावानजीक जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी साचल्यामुळे निळीक, कोंडिवली, अलसुरे, शीव आदी गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला. शहरातील सफा मसजीद चौक, साठे मोहल्ला, पौत्रिक मोहल्ला, तांबे मोहल्ला, निवाचा चौक, गांधी चौक, पानगल्ली, गुजरआळी, बाजारपेठ आदी ठिकाणी पुराचे पाणी शिरल्याने व्यापार्‍यांची तारांबळ उडाली. 

नदीकाठी बघ्यांची गर्दी  

खेडमध्ये मुसळधार पावसाने जगबुडी, नारंगी व चोरद नदीने रूद्रावतार धारण केला. ढगफुटीप्रमाणे पाऊस कोसळल्याने व पूर आल्याने परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी व ग्रामस्थांनी नदी किनार्‍यांवर हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जगबुडी नदी, गणेश घाट, खेड-दापोली मार्गावरील कन्याशाळा, योगीता दंत महाविद्यालय, भरणे येथील जगबुडी नदीवरील पूल, चोरद नदी आदी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. महामार्गावर वाहतूक पोलिसांची गस्त सुरू होती. 

सखल भागात पाणी साचले

मुसळधार पावसाने भरणेनाका येथील अनेक भागात पाणी साचल्याने परिसराला सरोवराचे स्वरूप प्राप्त झाले होते. छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजीक, काळकाई मंदिर परिसरात सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने एखाद्या सरोवराप्रमाणे दृश्य निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. 

एसटी सेवेवर परिणाम

खेड बसस्थानकातून ग्रामीण भागात जाण्यासाठी सोडण्यात येणार्‍या निम्म्याहून अधिक बसफेर्‍या मुसळधार पावसाने रद्द करण्यात आल्या होत्या. लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सकाळपासून खेड बसस्थानक व आगारात अनिश्‍चित कालावधीसाठी थांबवून ठेवण्यात आल्या. खेड-दापोली मार्ग बंद असल्याने व महामार्ग बंद असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या स्थानकातून सोडण्यात आल्या नाहीत. शुक्रवारी रात्री ग्रामीण भागात गेलेल्या मुक्कामी गाड्या काही भागात अडकून पडल्या. महामार्गावरून खेडच्या दिशेने येणारी कशेडी-खेड ही बस बोरघरनजीक साचलेल्या पाण्यात अडकून पडली.
धरण क्षेत्रात 150 मिमी पाऊस खेड तालुक्यातील नातूवाडी धरण परिसरात शनिवारी दुपारी 12.30 वाजेपर्यंत 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाची संततधार सुरूच असून नद्यांसह धरणातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे.