Tue, Mar 26, 2019 08:23होमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्गावर दरडींचा धोका

मुंबई-गोवा महामार्गावर दरडींचा धोका

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 10:34PMखेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामामुळे डोंगर फोडून मातीचे भराव करण्यात येत आहेत. कशेडी ते परशुराम घाटदरम्यान धोकादायकरीत्या माती व दगड रस्त्याशेजारीच ठेवण्यात आले आहेत. भरणे ते भोस्ते घाटातील खोदाईमुळे माती रस्त्यावर आल्याने दुचाकी घसरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. घाटांमधील खोदाईमुळे भूस्खलनाचा धोका व्यक्‍त होत आहे. कशेडी ते परशुराम या भागात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी संबंधित कंपनीने डोंगर भागात मोठ्या प्रमाणात मातीची खोदाई केली आहे. खोदाईनंतरची माती सध्याच्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाच्या बाजूने जागेत पसरली आहे.

 पावसाळ्यापूर्वी  ही माती जुन्या मार्गावर येऊ नये, याबाबत खबरदारी घेण्यात आलेली नाही. पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी माती रस्त्यावर येऊन चिखल झाला आहे. रस्त्यावर आलेल्या मातीमुळे गेल्या दोन दिवसांमध्ये चार दुचाकी घसरून स्वार जखमी झाले आहेत. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचा असलेल्या भोस्ते घाटात महामार्ग चौपदरी करताना संबंधित ठेकेदाराने डोंगर खोदले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलनाचा धोका आहे. घाटाच्या पायथ्याशी भोस्ते हे गाव असून तेथील रहिवासी  दरड कोसळेल या भितीच्या छायेखाली वावरत आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या व भराव करण्यात आलेल्या मातीमुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीतून देखील सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वाहनचालकांची तारेवरची कसरत

राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने निश्‍चित करून दिलेल्या ठिकाणी नवीन चौपदरी रस्त्यावर मोर्‍या बांधण्याचे कामदेखील कशेडी ते परशुराम या भागात संबंधित ठेकेदाराकडून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे मोर्‍यांच्या बांधकामासाठी खोदलेल्या चरांमध्ये अतिवृष्टी काळात पाणी साचून ते सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून वाहत आहे. भोस्ते घाटात डोंगर खोदलेल्या ठिकाणी पावसाचे पाण्यासोबत मोकळी झालेली माती चिखल रूपाने रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.