Tue, May 21, 2019 22:10होमपेज › Konkan › खेडमध्ये जंगम समाजाचे उपोषण सुरूच

खेडमध्ये जंगम समाजाचे उपोषण सुरूच

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 9:10PMखेड : प्रतिनिधी  

महाराष्ट्रभर गाजत असलेल्या अंकिता जंगम मृत्यूची आता राज्यभरातून जंगम समाजाने दखल घेतल्याचे दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्यातून जंगम समाज खेड येथील अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाने आयोजित केलेल्या साखळी उपोषणास सहभागी होत आहे. 28 डिसेंबर रोजी अंकिताचे अपहरण करत तिची हत्या केल्याचा तिच्या कुटुंबाचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिस व वैद्यकीय अधिकार्‍यांनी केलेल्या संशयास्पद कार्यवाहीची ‘सीबीआय’ चौकशी करुन या प्रकरणातील गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची मागणी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाने केली आहे. गेल्या 19 फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण खेड येथील जिल्हा उपविभागीय कार्यालयासमोर सुरू केले आहे. 

उपोषणास आज आठ दिवस उलटत असून शासनाने कसलीही कार्यवाही न केल्याने पुढील काळात आंदोलन तीव्र स्वरुपात करण्याचे अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे अध्यक्ष भिवलिंग स्वामी, कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम व  संघटक वैजनाथ स्वामी यांनी सांगितले आहे. अंकिताच्या शवविच्छेदनात अनेक त्रुटी असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असून शवविच्छेदन करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यास निलंबित करण्याची मागणी करत अखिल भारतीय वीरशैव महासंघाने सुरु केलेल्या साखळी उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे. आ. संजय कदम, आ. भास्कर जाधव, जि.प. सभापती चंद्रकांत कदम, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव, शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, सदानंद कदम यांच्यासह साडेसातशे जणांनी उपोषणात सहभाग घेतला.