Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Konkan › खेडमध्ये मराठा बांधवांचा मोर्चा

खेडमध्ये मराठा बांधवांचा मोर्चा

Published On: Aug 09 2018 10:27PM | Last Updated: Aug 09 2018 10:07PMखेड : प्रतिनिधी

एक मराठा लाख मराठा, विषय गंभीर मराठा खंबीर, जय भवानी जय शिवाजी, कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय रहाणार नाय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. अशा घोषणांनी खेड शहर दुमदुमले. हजारोंच्या संख्येने शिस्तबद्धपणे शहरातील महाडनाका येथील एस.टी.मैदानात जमलेला सकल मराठा समाजबांधवांनी शहरातील विविध भागांतून मोर्चा काढला. यानिमित्त खेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी आमदार, खासदार व उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदने देण्यात आली. मोर्चा व महाराष्ट्र बंद यांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व व्यवहार बंद होते. दुकाने, राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा, बँका आदी सर्वच खासगी व सरकारी यंत्रणा ठप्प झाल्याने खेडमध्ये शुकशुकाट होता. 

गुरूवार दि.9 रोजी नियोजीत मोर्चा व बंदच्या पार्श्‍वभूमीवर खेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व दुकाने, महामार्गावरील रहदारी पूर्णपणे बंद होती. खेडवासीयांनी आजवर कधीही अशा प्रकारचा कडकडीत बंद अनुभवला नव्हता. दिवसभर चोवीस तास गजबजलेल्या ठिकाणी शुकशुकाट होता. खेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजता शहरातील महाडनाका येथील एसटी मैदानात एकत्र येऊन मोर्चाला सुरवात झाली. 

मोर्चाच्या अग्रभागी सात ते आठ बैलगाड्या होत्या. मोर्चाला महाडनाका येथून सुरुवात झाल्यानंतर हळुहळू पुढे सरकत हजारोंचा जनसमुदाय मराठा भवन येथील तहसील कार्यालयाजवळ पोहोचला. तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर पंचायत समिती कार्यालयासमोरून मोर्चाने शिवाजी चौकात दाखल होत तेथून पुढे बसस्थानकाच्या जवळून वाणीपेठ, निवाचा चौक, गांधी चौक, बाजारपेठ मार्गे हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मारकाजवळ पोहोचला. हुतात्मा कान्हेरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी चौक, बाजारपेठ, पोलिस ठाणे, तीनबत्तीनाका आदी ठिकाणी खेड तालुका सकल मराठा समाजातर्फे पिण्याचे पाणी व बिस्कीट पुडे मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. या मोर्चात सहभागी झालेल्यांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा व  अन्य वाहनेदेखील तैनात करण्यात आली होती. शहरातील शिवाजी चौकात नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मोर्चेकर्‍यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले होते.

भरणेनाका ते शहरातील सर्वच मार्गावर सशस्त्र पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. वाहतूक नियमना सोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस कर्मचार्‍यांना रेस्क्यू टीम खेडमधील स्वयंसेवक अन्य सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते देखील स्वयंप्रेरणेने सहकार्य करत होते. मराठा मोर्चात मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते केशवराव भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आ. संजय कदम, युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य योगेश कदम, दुर्गा भोसले-शिंदे आदींसह हजारोंच्या संख्येने महिला, तरूणी, तरूण व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले 
होते.