Tue, Apr 23, 2019 13:55होमपेज › Konkan › तीन पिढ्यांनंतर घरात पडला प्रकाश

तीन पिढ्यांनंतर घरात पडला प्रकाश

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:35PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील मोहाने गावातील हुसैन मणियार यांच्या घरी तब्बल तीन पिढ्या अंधारात गेल्यानंतर वीज जोडणी देण्यात आली आहे. महावितरणच्या अजब कारभाराचा हा नमुना असल्याचे पुन्हा उघड झाले आहे.  धनदांडग्यांच्या घरी व बिल्डर लॉबीसाठी एका शब्दात बिन नोंदणीचे मीटर बसवण्यार्‍या महावितरणकडून 79 वर्षांच्या वृद्धाला वीज जोडणीसाठी चपला झिजवाव्या लागल्या, ही संतापाची बाब आहे. त्यांनी वीज जोडणीची मागणी केल्यापासून जेवढा विलंब झाला तेवढ्या कालावधीत मणियार कुटुंबाला झालेला मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास याची भरपाई कोण करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

खेड तालुक्यील मोहाने हे गाव तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात सर्वच ठिकाणी नागरिकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. परंतु गावातील हुसैन मणियार यांच्या घरी मात्र तीन पिढ्या उलटल्या तरी वीज जोडणी देण्यास महावितरणकडून विलंब होत आला. अखेर 79 वर्षांचे मणियार यांना वृद्धापकाळाने याबाबत पाठपुरावा करणेदेेखील शक्य होईना. त्यामुळे त्यांनी शिवसेना शाखाप्रमुख दिलीप साबळे यांच्यासह गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना ही बाब सांगितली.

जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती चंद्रकांत कदम व खेड पंचायत समिती उपसभापती विजय कदम यांना मोहाने शाखाप्रमुख साबळे यांनी मणियार यांची समस्या सांगितल्यानंतर त्यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांकडे ही समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर काही दिवसांपूर्वीच मणियार यांच्या घरी वीज जोडणी देण्यात आली.

तीन पिढ्या अंधारात गेल्यानंतर वीज पुरवठा सुरू झाल्याने मणियार यांच्या कुटुंबियांनी आनंदोत्सव साजरा केला व त्यांना सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार मानले. परंतु, मणियार यांच्या घरी वीज जोडणी देण्यास एवढा विलंब का झाला? या प्रश्नाचे उत्तर शोधून त्यांना वीज जोडणी मिळावी यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षात त्यांचे झालेले शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरून मिळणे गरजेचे आहे, असे मत व्यक्‍त होत आहे.