Fri, Jul 19, 2019 18:24होमपेज › Konkan › सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणार्‍यावर खेडमध्ये गुन्हा

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणार्‍यावर खेडमध्ये गुन्हा

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 10:54PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील ऐनवली गावातील अंकिता जंगम हिच्या संशयास्पद मृत्यूचा खेड पोलिसांमार्फत तपास सुरू आहे. यातच ऐनवली येथील वरचीवाडी येथील तरूणाने व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये खोटी पोस्ट टाकून समाजामध्ये भीतीचे व द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याच्या संशयावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॅनियल बेन यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 30 डिसेंबर 2017 रोजी ऐनवली पेंडरीचा पूल या ठिकाणी जगबुडी नदीपात्रात अंकिता सुनील जंगम हिचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत तिची आई सुचिता सुनील जंगम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खेड पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच दि. 6 जानेवारी 2018 रोजी खेड येथील सिंह गर्जना प्रतिष्ठान व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर कोपर्डीतल्या ताईला न्याय मिळाला मग खेडमधल्या ताईला न्याय कधी मिळेल, पोस्ट टाकण्यात आली होती. 

या ग्रुपचे अ‍ॅडमिन हेमंत भोसले व सचिन घाटगे यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडे ही पोस्ट कोणत्या पुराव्याच्या आधारावर टाकण्यात आली, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर ग्रुपमधील सदस्य नितीन राजाराम मोरे हा ऐनवली वरचीवाडी येथील रहिवासी असून त्याने पोस्ट टाकल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भोसले व घाटगे यांच्याकरवी सदर पोस्ट टाकणार्‍या मोरे यास पोलिसांनी बोलाविले. अंकिता जंगम हिच्यावर सामूहिक अत्याचार झालेला असून तो घातपात असल्याबाबत आपण टाकलेल्या पोस्टबाबत आपणाकडे कोणते पुरावे आहेत का, असा सवाल करण्यात आला. तसेच त्यांना पुरावे सादर करण्यास अवधीही देण्यात आला. मात्र, पुरावे सादर होऊ न शकल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.