खेड : प्रतिनिधी
तालुक्यातील नातूनगर घागवाडी या ठिकाणी शिवसेना गटप्रमुख संजय घाग यांच्याकडे गेलेल्या शिवसेना तालुकाप्रमुख भालचंद्र बेलोसे यांना किरकोळ कारणावरून आमदार संजय कदम यांच्या पुतण्याने सहकार्यांसह शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी संग्राम याच्यासह पंचवीस ते तीसजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दि. 11 रोजी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना तालुकाप्रमुख राजा बेलोसे यांनी सोमवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे बेलोसे हे दि. 11 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नातूनगर घागवाडी या ठिकाणी शिवसेना गटप्रमुख संजय घाग यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्यांची स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या बाजूला होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकचा चालक सतत हॉर्न देऊ लागला. त्यावेळी बेलोसे यांनी दोनच मिनिटांत गाडी पुढे घेतो, असे सांगितले. तसेच त्याला तुझ्याकडे पास आहे का? असे विचारले. याचा राग येऊन तेथील अजय बेलोसे याने राजा बेलोसे यांना गाडी बाजूला न घेतल्यास डम्पर गाडीवर चढवेन, अशी धमकी दिली. यानंतर अजय याने आ. संजय कदम यांचा पुतण्या संग्राम कदम तसेच वीस ते पंचवीस जणांना त्या ठिकाणी बोलावले. यावेळी सर्वांनी राजा बेलोसे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व हाताच्या थापटाने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राजा बेलोसे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.