Sat, Jul 20, 2019 10:48होमपेज › Konkan › आदित्य ठाकरेंनी साधला युवकांशी संवाद

आदित्य ठाकरेंनी साधला युवकांशी संवाद

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 9:42PM

बुकमार्क करा
खेड : वार्ताहर

सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे खेडमध्ये येणार म्हणून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ न शकल्याने अखेर त्यांचा दौरा रद्द झाला आणि त्यांनी चक्क व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खेडमधील युवकांशी 20 मिनिटे संवाद साधला. त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. मंगळवारी खेडमधील योगीता डेंटल कॉलेजमध्ये ‘शिवसेना टॉप स्कोरर’ या वेबसाईटचे उद्घाटन आणि पाटीदार हॉल या ठिकाणी आयोजित युवा सेना पदाधिकार्‍यांचा मेळावा तसेच नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आदित्य ठाकरे न आल्यानेे अखेर या मेळाव्याला स्थानिक युवा सेना नेते योगेश कदम यांनी संबोधित केले.

यावेळी बोलताना योगेश कदम म्हणाले की, खेड - दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तीन तालुक्यांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मतदारसंघात विकासकामे करण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी त्यांनी आघाडी शासनावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, खेड-दापोली विधानसभा मतदारसंघात 14 लघु पाटबंधारे आहेत. त्यांच्या पूर्णत्वासाठी आणि दुरुस्तीसाठी तब्बल 100 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. गेल्या 15 वर्षांत आघाडी सरकारने एक रुपयाही या धरणांसाठी दिला नाही.  शिवसेना नेते रामदास कदम यांच्या माध्यमातून सव्वातीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, या कामात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.

धरणांची कामे असो अथवा जलसंधारणाची कामे जिल्ह्यात मोठा गैरव्यवहार या कामांमध्ये झाल्याचे आपण स्वतः उघड केले आहे. लवकरच याची उच्चस्तरीय  चौकशी होऊन दोषींना जनतेसमोर आणले जाईल, असेही योगेश कदम यांनी सांगितले.  मेळाव्यास शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम, शंकर कांगणे, मंडणगडचे तालुकाप्रमुख संतोष गोवळे, दापोलीचे तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.