Mon, Apr 22, 2019 02:32होमपेज › Konkan › केरळच्या मदतीला ‘खेड रेस्क्यू टीम’धावणार!

केरळच्या मदतीला ‘खेड रेस्क्यू टीम’धावणार!

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 18 2018 9:07PMखेड :  प्रतिनिधी

आपल्या शेजारील राज्य असणार्‍या केरळमध्ये पावसामुळे महापूर येऊन निर्माण झालेल्या आपत्कालीन भयंकर परिस्थितीमुळे तेथील 13 जिल्हे जलमय झाले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील आपद्ग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी खेडमधील ‘रेस्क्यू टीम खेड’ दि. 23 ऑगस्ट रोजी केरळला रवाना होणार असल्याची माहिती ‘रेस्क्यू टीम खेड’चे अध्यक्ष बुर्हाण टांके यांनी दिली. तसेच त्यांनी जास्तीत-जास्त मदत त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी उद्योजक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था यांना मदतीचे आवाहनही केले आहे.

केरळ येथे पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून तेथील लोकांना अत्यावश्यक सुविधांची मोठी कमतरता जाणवत आहे. केरळ राज्यात निसर्गाने केलेल्या प्रकोपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि तेथील जनतेला मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्रही सरसावला असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील रेस्क्यू टीमही मदतीसाठी सरसावली आहे.

आपद्ग्रस्तांना चादर, ब्लँकेट्स आणि प्रथोमोपचाराचे साहित्य घेऊन  हे पथक जाणार आहे. रेस्क्यू टीमच्या माध्यमातून हाती घेतलेल्या या उपक्रमाला खेडमधून मदतीचा ओघ सुरु झाला असून जास्तीत -जास्त मदत केरळसाठी घेऊन जाण्यासाठी व्यापारी,  उद्योजक आणि स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असे आवाहन ‘रेस्क्यू टीम’चे अध्यक्ष बुर्हाण टांके यांनी केले आहे. नुकत्याच पोलादपूर महाबळेश्‍वर मार्गावर आंबेनळी घाटातही खेड रेस्क्यू टीमच्या तरुणांनी सर्वात आधी पोचून शेकडो फूट खोल दरीत कोसळलेल्या बसमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी नि:स्वार्थी आणि सेवाभावी वृत्तीने शासनास सहकार्य केले होते त्याबद्दल 15 ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजारोहणानंतर महसूल आणि पोलिस प्रशासनातर्फे ‘खेड रेस्क्यू टीम’च्या सर्व धाडसी तरुणांचा शासकीय विशेष कार्य प्रमाणपत्र देऊन सन्मान केला होता.