Mon, Jun 24, 2019 21:55होमपेज › Konkan › खेडमध्ये मंत्र्यांना रोखले

खेडमध्ये मंत्र्यांना रोखले

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Sep 01 2018 12:06AMखेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. 31) खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘मनसे’च्या वतीने महामार्गावर भरणेनाका या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा भरणे नाक्यावर अडविण्यात झाला. अखेर या आंदोलनाची दखल घेत ना. पाटील तेथे थांबले व ‘मनसे’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी दहा मिनिटे चर्चा करीत महामार्ग, चौपदरीकरण व गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्ती याबाबत ठोस आश्‍वासन देऊन ते चिपळूणच्या दिशेने मार्गस्थ झाले.

शुक्रवारी सकाळी 11.30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत तब्बल अडीच ते तीन तास 400 ते 500 आंदोलनकर्ते महामार्गावर ठिय्या मारून बसले होते.  दुपारी 2  वाजण्याच्या सुमारास ना. पाटील भरणे नाका येथे पोहोचले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ताफ्यासमोर येत गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी  पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली.

शुक्रवार दि. 31 रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याने याच दिवशी ‘मनसे’ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाड्या अडवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी ‘या सरकारच करायचा काय, खाली डोके वरती पाय’, ‘चंद्रकांतदादांचा निषेध असो’, युती सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत चक्का जाम केला. सकाळी 11.30 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी आ. संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शहराध्यक्ष पप्पू चिकणे, महिला आघाडीच्या नंदिनी खांबे,  ‘मनसे’चे कोकण विभागीय संघटक व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलन चालू असताना दुसर्‍या बाजूला खेड तालुक्यातील भाजपची काही मोजकी मंडळी भरणे नाक्यात ना. पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होती.  यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बाळ माने आंदोलनाच्या ठिकाणी आले. आ. संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची त्यांनी भेट घेतली. शासकीय विश्रानगृहात बांधकाम मंत्र्यांशी चर्चा करू, असे सांगितले. मात्र, आ. कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपण भेटू तर रस्त्यावरच. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी आपण कोठेही जाणार नाही. आपली भेट ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्याच ठिकाणी महामार्गावर होईल, असे सांगत आंदोलन सुरुच ठेवले.

मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या ज्वलंत विषयासंदर्भात महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेल्या बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा भारणेनाका याठिकाणी येताच आंदोलकांनी ताफा अडवला. आ. कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि शेकडो कार्यकर्ते बांधकाममंत्र्यांच्या गाडीकडे गेले. बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गाडीतून उतरत 10 मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. आंदोलकांना आवरण्यासाठी स्थानिक पोलिस आणि राखीव पोलिस दलाच्या जवानांची कसरत झाली. बांधकाम मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी देखील सुरक्षा कडे केले होते. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ना. पाटील यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले.