Thu, Jun 27, 2019 11:39होमपेज › Konkan › खडपोली एमआयडीसीमध्ये आगीचे तांडव  

खडपोली एमआयडीसीमध्ये आगीचे तांडव  

Published On: Mar 03 2018 1:48AM | Last Updated: Mar 02 2018 10:33PMचिपळूण : खास प्रतिनिधी 

तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा केमिकल्स अँड अँटी ऑक्सिडंट लि. कंपनीचे गोडावून आणि प्लांट ए-1 आगीत जळून खाक झाला. ऐन शिमगोत्सवात आणि होळीच्या दिवशीच शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मात्र, वारंवार स्फोट होत असल्याने ती आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. हा भडका मोठा असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नव्हते.

शुक्रवारी भर दुपारी ही आग भडकली. खडपोली एमआयडीसीमध्ये अग्निशमन बंब नसल्याने आग अधिक भडकली. तत्काळ याची माहिती या भागात समजताच परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी धाव घेऊ लागले. शिरगाव पोलिसांना खबर देण्यात आली. तर चिपळूण नगरपरिषदेचे अग्निशमन बंब मागवण्यात आले. परंतु, या काळात आग अधिकच भडकली आणि धुराचे लोट आकाशात जाऊ लागले. अधूनमधून केमिकल्सचे स्फोट होत असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी पुढे जाण्याचे कोणीच धाडस करत नव्हते. बंबातील पाणी संपले तरी आग आटोक्यात येत नव्हती. बंबाने पाणी मारल्यावर आग अधिक भडकत होती. महानिर्मिती पोफळी कंपनीचे तीन आणि चिपळूण न.प.चे बंब येथे दाखल झाले होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळाले नव्हते. 

रासायनिक पदार्थ असल्याने आग अधिकच भडकत होती. अखेर प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव  कोणालाही या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. रासायनिक धुराचे लोट असल्याने या भागात काळा धूर पसरला होता. त्यामुळे लांब उभे राहून पाहणे याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. सुदैवाने या गोडावून आणि प्लांटमध्ये शिमग्याची सुट्टी असल्याने कोणीच नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. 

सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. आगीचे कारण समजू शकलेले नाही. हे वृत्त समजताच शिरगावच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव, तहसीलदार जीवन देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी जानवे आणि पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. खडपोली रस्त्यावर झालेली बघ्यांची गर्दी पांगवण्यात आली. या भागात शिरगाव पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षिततेसाठी गाणे खडपोली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.