Sat, Apr 20, 2019 08:14



होमपेज › Konkan › ‘त्यांच्या आत्मिक समाधानाचा आम्हाला आनंद’

‘त्यांच्या आत्मिक समाधानाचा आम्हाला आनंद’

Published On: Feb 12 2018 1:58AM | Last Updated: Feb 11 2018 9:40PM



साटेली-भेडशी : वार्ताहर

तिलारी घाटरस्त्यासाठी निधी कुठून आला हे त्यांना माहीत नाही, रस्ता कोणत्या खात्याच्या मालकीचा आहे हे माहीत नाही, तरीही केवळ श्रेयलाभ घेण्यासाठी व आत्मिक समाधानासाठी त्यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले, त्यात आम्हालाही आनंद आहे, त्यांनी काल हा प्रकार केला नसता तर आजच्या कार्यक्रमाला त्यांनाही आम्ही सन्मानाने आमंत्रित केले असते, अशा उपरोधिक शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपने केलेल्या उद्घाटनाची खिल्ली उडवली.  ना. दीपक केसरकर यांनी रविवारी डागडुजी केलेल्या तिलारी रामघाटाचे शासकीय अधिकृत उद्घाटन  केले. यावेळी ते बोलत होते.

 ‘श्रेयवादाची आम्हाला सवय नाही’

सर्व कार्यकर्त्यांनी मिळून मिसळून काम करा, मला लोकांची कामे करणे एवढेच माहीत आहे. त्या केलेल्या कामाचा श्रेयवाद घेण्याची  सवय नाही. तालुक्यासाठी यापुढे विविध विकासकामे करणार आहे. यातील तिलारी, तेरवण मेढे या ठिकाणी पर्यटन केंद्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून येथील प्रत्येक गाव पर्यटन केंद्र होईल, असे प्रयत्न करणार आहेत, असे ना. केसरकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार शिवसेना पदाधिकारी गोपाळ गवस यांनी मानले.
 या उद्घाटनाला   सा. बां. च्या कोल्हापूर विभागाचे कार्यकारी  अभियंता श्री.वेदपाठक, दोडामार्गचे सभापती गणपत नाईक, शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी, प्रकाश परब, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तहसीलदार रोहिणी रजपूत, तालुका संघटक संजय गवस, दौलत राणे, मदन राणे, विनीता घाडी, माजी सभापती विशाखा देसाई, लक्ष्मण आयनोडकर,  भगवान गवस आदी उपस्थित होते. 

ना. केसरकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून या घाटरस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील नागरिक, वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता पाटबंधारे विभागाने तिलारी धरण निर्मितीसाठी बनविला असल्याने म्हणावी तशी डागडुजी होत नव्हती. परंतु या घाटमार्गातून वाहतूक मात्र मोठ्या प्रमाणात होती. ही परिस्थिती लक्षात घेतल्यावर आपण  पुढाकार घेवून पाटबंधारे व  उर्जामंत्री यांची एकत्रित बैठक घडवून  घाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी तत्काळ  निधी उपलब्ध करून रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केले.  

 या घाटरस्त्यासाठी पाटबंधारे मंत्र्यांकडून 3 कोटी 30 लाख, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडून 1 कोटी 60 लाख एवढा निधी उपलब्ध करण्यात आला.  घाटातील राहिलेला एक कि.मी.रस्ता, संरक्षक कठडे, फलक, रिफ्लेक्टर या सर्वांसाठी 80 लाख रु. मंजूर करण्यात आले असून ते कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काम पूर्ण झालेला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करा, असे कार्यकारी अभियंता श्री. वेदपाठक यांना सांगितले. प्रस्तावित मोर्ले- पारगड रस्ता, मांगेली सडारस्ता व तेरवण मेढे ग्रामस्थांनी  श्रमदानातून केलेल्या रस्त्याला बक्षीसपत्र करून दिल्यानंतर या रस्त्यासाठी आमदार निधी उपलब्ध होणार आहे. तिलारी पर्यटन केंद्र, हत्ती पुनर्वसन कामासाठी  27 कोटी रुपये, हेवाळे पूल, हॅप्पी एग (अंडी) प्रकल्प इ. कामे मंजूर करण्यात आली आहेत. याचीही उद्घाटने होणार असल्याचे ना. केसरकर यांनी सांगितले.