Fri, Jul 19, 2019 23:17होमपेज › Konkan › कातकरी समाजाची शासनस्तरावर आकडेवारीच नाही

कातकरी समाजाची शासनस्तरावर आकडेवारीच नाही

Published On: Dec 18 2017 2:36AM | Last Updated: Dec 17 2017 8:13PM

बुकमार्क करा

खेड : वार्ताहर

समाजातील एक घटक असताना देखील सदैव दुर्लक्षीत व वंचित जीवन जगण्यास भाग पडत असलेल्या आदिम आदिवासी कातकरी समाजाची निश्‍चित लोकसंख्यादेखील सरकारी यंत्रणेकडे प्राप्त नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

आदिम आदिवासी कातकरी समाजाच्या संघटनांमार्फत सन2002 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात खेड तालुक्यात 34 हून अधिक गावांमध्ये कातकरी कुटुंबांचे व साडेचार हजार लोकांचे वास्तव्य असताना सन2016च्या सरकारी आकड्यांमध्ये तालुक्यात 26 गावांमध्ये कातकरी समाजाची लोकसंख्या मात्र 1250 एवढीच नोंद आहे. अशाचप्रकारे जिल्ह्यातील मंडणगड, चिपळूण आदी तालुक्यातील कातकरी समाजाच्या लोकसंख्येबाबत शासनाकडेच विश्‍वासार्ह आकडेवारी नाही. त्यामुळे शासकीय योजना राबविण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत.

खेड तालुक्यात कातकरी समाजाची 264 कुटुंबे व 231 झोपड्या अथवा घरांचा उल्लेख आहे. त्यामुळे कातकरी उत्थान अभियानाचे परिपत्रक जरी येऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी त्यामध्ये त्रुटी असल्याचे समोर येत असून खर्‍या अर्थाने कातकरी उत्थानासाठी कातकरी जनगणनेसह सखोल फेरसर्व्हेक्षणाची गरज आहे.

कोकणात रायगड, ठाणे, पालघर व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आदिम आदिवासी कातकरी समाज गेल्या शेकडो वर्षांपासून वास्तव्य करत आहे. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशकं उलटली तरी या समाजातील लोकांची संख्या नक्की किती आहे, हे मात्र समजून घेण्यात कोणत्याही सरकारला अनास्थेमुळे यश आलेले नाही. त्यामुळे सरकारी पातळीवरून कितीही योजना या आदिम आदिवासींसाठी तयार झाल्या तरी निश्‍चित लोकसंख्या माहिती नसल्याने या समाजातील निम्म्याहून अधिक लोक शासकीय योजनांपासून वंचित रहात असल्याचे चित्र आहे.

सरकारने कातकरी उत्थान अभियानाचा बिगुल जुलै 2017 मध्ये फुंकला आहे. परंतु पायाभुत माहितीमध्ये अचूक लोकसंख्येची माहितीच उपलब्ध नसल्याने व ती मिळवण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांमध्ये उदासिनता असल्याने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवताच येत नसल्याचे दिसते. सरकारने आदिम आदिवासी वास्तव्य करत असलेल्या जागा त्यांच्या नावे करण्याचे धोरण निश्‍चित केले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ आदिवासी कातकरी कुटुंबांना होईल का, हा यक्ष प्रश्‍न आहे.

खेड तालुक्यात सरकारी कार्यालयातून प्राप्त आकडेवारीनुसार आस्तान, धवडे, किंजळेतर्फे नातू, देवघर, वरची हुंबरी, वाडीबीड, खालची हुंबरी, तळे, चिंचवाडी, कुडोशी, म्हाळुंगे, मांडवे, खवटी, बोरघर, पुरे बुद्रूक, साखरोली, चिंचघर, मुसाड, चिरणी, शेल्डी, शिव मोहल्ला, शिव खुर्द, कुळवंडी, तिसंगी, खोपी, बिजघर व हेदली या गावांमध्ये 1250 कातकरी लोकसंख्या असून 264 कुटुंब आहेत. तालुक्यात कातकरी घर किंवा झोपड्यांची संख्या 231 असून कुटुंबातील सदस्यांची संख्या 1204 दर्शवण्यात आली आहे. तालुक्यातील कातकरी कुटुंबांच्या घराखालील स्वमालकीच्या जमिनींचे एकूण क्षेत्र 0-29-83(हे.आर) एवढे असून अन्य कातकरी घरे खाजगी व्यक्तीच्या 1-48-78 (हे.आर) जमीनीवर असल्याचे सन2016 मध्ये प्राप्त आकडेवारीमध्ये नमूद आहे. 

आदिम आदिवासी कातकरी समाजाचे कार्यकर्ते नाना वाघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेमार्फत सन2002 करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार सापिर्ली, पोसरे, धामणंद, मुसाड, चिरणी, शेल्डी, शिव, खोपी, बिजज्ञर, मिर्ले, आपटाकोंड, कुळवंडी, तिसंगी, सवेणी, किंजळे, धवडे, अस्तान, वाडीबीड, हुंबरी, देवघर, कुडोशी, खवटी, बोरघर, चिंचघर, पुरे, मांडवे, तळे, कोरेगाव, साखरोली, आंबये आदी ठिकाणी प्रत्येकी दहा पेक्षा जास्त कातकरी कुटुंब वास्तव्य करत आहेत. तर सुकीवली, बोरज, शिव, चिरणी आदींसह अनेक गावांमध्ये 2 ते 6 कातकरी कुटुंब वास्तव्य करत आहेत. तालुक्यात 34 पेक्षा जास्त गावांमध्ये साडे चार हजार पेक्षा जास्त कातकरी लोकसंख्या असताना सरकारी आकड्यांमध्ये व संघटनेच्या सर्व्हेक्षण आकड्यांमध्ये एवढी तफावत पाहता कातकरी लोकसंख्येच्या निश्‍चितीची नितांत गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. 

राज्य सरकारने कातकरी उत्थान अभियान सुरू केले असले तरी नक्की कोणत्या माहितीच्या आधारे हे कातकरी उत्थान केले जात आहे. हा संशोधनाचा भाग आहे. जुलै2017 मध्ये कोकण आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात कातकरी वस्त्यांचे  फेरसर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे. परंतु गेल्या पाच महिन्यांत याबाबत गाव पातळीवरील सरकारी कर्मचार्‍यांच्या अनास्थेमुळे स्वातंत्र्यानंतर देखील अनेक दशके दुर्लक्षित राहिलेल्या कातकरी समाजाला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येण्याचे सर्वच मार्ग बंद होताना दिसत आहेत. 

राज्य सरकारने कातकरी उत्थानचा फार्स न करता खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याचे माप कातकरी समाजाच्या पदरात टाकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील कातकरी समाजाची लोकसंख्या जनगणना करून प्रामाणिक आकडेवारी व सामाजिक स्थितीची माहिती संकलीत करण्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा या समाजासाठी काम करणार्‍यांकडून होत आहे.