Wed, Aug 21, 2019 19:05होमपेज › Konkan › कशेडी घाटाचे रुपडे पालटणार

कशेडी घाटाचे रुपडे पालटणार

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 9:24PMखेड : प्रतिनिधी

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाअंतर्गत कशेडी घाटाच्या  भुयारी मार्गाच्या निविदेचे सोपस्कार पूर्ण झाले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला हा ठेका मिळाला आहे. येत्या 30 महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. जाण्यासाठी तीन तसेच येण्यासाठी तीन अशा सहा लाईनचा हा भुयारी मार्ग होणार आहे. रायगडला रत्नागिरीशी जोडणार्‍या या भुयारी मार्गामुळे घाटाचे रुपडे पालटणार असून वेळेतही मोठी बचत होणार आहे.

वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे कशेडी घाट नेहमीच चर्चेत असतो. सध्या युद्धपातळीवर सुरु असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे या घाटाचा चेहरामोहरा बदलणार असून या घाटातील 3.44 कि. मी. लांबीचा व 441 कोटी रुपये खर्चाचा बोगदा   ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनी तयार करणार आहे. हा प्रस्तावित बोगदा 30 महिन्यांत पूर्णत्वास जाणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग 66 च्या पुनर्वसनासाठी आणि सुधारणा करण्याकरिता रोड ट्रान्स्पोर्ट आणि महामार्ग मंत्रालयाने  441 कोटी रुपये अभियांत्रिकी, प्रोक्युआरमेंट आणि कन्स्ट्रक्शन यांच्याशी हा करार केला आहे. त्यामुळे कशेडी घाटातील प्रस्तावित बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात येणार आहे.

आगामी काही दिवसांत बोगद्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. एकूण सह लेनच्या बोगद्या व्यतिरिक्‍त झालेल्या करारानुसार 7.2 कि. मी. लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्‍का रस्ताही प्रस्तावित करण्यात आल्याने या रस्त्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर हीच कंपनी करणार आहे.441 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत बोली लावण्यात आली होती. त्यामध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसह सीएआय, युक्रेनसह जगभर प्रसिद्ध असलेल्या अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, या प्रकल्पाचे काम सार्वजनिक क्षेत्रात वीज, मेट्रो, रेल्वे, परमाणू ऊर्जा प्रकल्प, हवाई गुणवत्ता नियंत्रण, समुद्र, रेल्वे, बंदर आणि पायाभूत प्रकल्पांसाठी कार्यरत असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे.

या बोगद्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. कशेडी बोगद्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया गतवर्षी पार पडली होती. दि. 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत टेंडर भरण्याची अंतिम तारीख होती. यामध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने बाजी मारली असून   कशेडी घाटातील भुयारामध्ये जाण्यासाठी 3 व येण्यासाठी 3 अशा एकूण 6 लेन तयार करण्यात येणार आहे. घाटाचा फोडून त्यातून हा भुयारी मार्ग केला जाणार आहे. अनेक नागमोडी वळणे तसेच डोंगरमाथे मागे हटवत कशेडी घाटाची निर्मिती करण्यात येणार असून अपघात झाल्यास निर्माण होणारी वाहतूक कोंडींचा विचार करुन या भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येत आहे.

Tags : Konkan, Kashedi Ghat, change