Fri, May 24, 2019 20:41होमपेज › Konkan › करजुवे-भातगाव खाडी प्रवास बंद

करजुवे-भातगाव खाडी प्रवास बंद

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 10:41PMआरवली : वार्ताहर

ऐन परीक्षांच्या कालावधीत होडीवर वैध सर्वेक्षण प्रमाणपत्र नसल्याचे कारण दाखवत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या बंदर विभागाने भातगाव-करजुवे खाडीतील नौकेद्वारे होणारी प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

भातगाव-करजुवे खाडीभागातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी आदी ठिकाणी जाण्यासाठी भातगाव खाडीतून नौकेने प्रवास करणे हा एकमेव पर्याय आहे. स्थानिक पातळीवर उच्चशिक्षणाची कोणतीच सोय उपलब्ध नाही. नोकरदारांसह रोजगारासाठी इथल्या ग्रामस्थांना खाडी ओलांडणे क्रमप्राप्त ठरते. रुग्णांनाही डेरवण अथवा रत्नागिरीत जायचे असेल तर हाच पर्याय आहे. 
सध्या भातगाव, कोसबी आदी ठिकाणाहून दहावी, बारावीसह इतर इयत्तेत शिकणारे 60 विद्यार्थी करजुवे, माखजन, सावर्डे असा प्रवास करतात. त्यांना एकमेव होडीचाच आधार आहे. हाच प्रवास बंद झाल्यास या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याच महिन्यात बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. याच काळात होडीसेवा बंद झाल्यास विद्यार्थ्यांनी परीक्षेला जायचे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बाबत नौकाचालक प्रकाश सीताराम महाकाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्यांनी बंदर विभागाच्या अटींची पूर्तता सुरू आहे. नौका सर्वेक्षण वैध प्रमाणपत्रासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी मिळणे आवश्यक आहे. येथील नौकाचालक निरक्षर आहेत. त्यांची आर्थिक स्थितीही हलाखीची आहे. मात्र, बंदर विभागाच्या आदेशामुळे ही सेवा बंद होत असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे.