Wed, May 22, 2019 15:07होमपेज › Konkan › कणकवलीतील रस्ता बनला ‘भंगार डेपो’

कणकवलीतील रस्ता बनला ‘भंगार डेपो’

Published On: Jul 02 2018 1:44AM | Last Updated: Jul 02 2018 12:22AMकणकवली वार्तापत्र : नितीन सावंत

प्लास्टिकच्या वस्तू, सडलेले पत्रे, लोखंड, स्क्रॅपमधील दुचाकी-चारचाकी गाड्या, टायर, बाटल्या, डबे अशा भंगारात गेलेल्या वस्तू रस्त्याच्या बाजूला महिनोंमहिने ठेवण्यात आले आहेत. भंगार म्हटले की एक ना हजार वस्तू आल्या. या सार्‍याचा साठा रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आहे. भंगार घेवून जाणारे टेम्पोही रस्त्यावरच भरले जातात. त्यामुळे शहरात एखादा नवीन आलेला वाहनचालक या रस्त्यावरून निघाला तर चुकून आपण भंगाराच्या डेपोत तर आलो नाही ना? असा समज झाला तर त्यात नवल वाटायला नको. ही स्थिती आहे कणकवलीतील तेलीआळी-उषा कन्स्ट्रक्शन ते सह्याद्री हॉटेलजवळ महामार्गाला जोडणार्‍या रस्त्याची.

कणकवली शहरातील या रस्त्यालगत स्क्रॅप मर्चंटचे डेपो गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. पूर्वी हा कच्चा रस्ता होता. न.पं.कडून काही वर्षापूर्वी डांबरीकरण  झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. तेलीआळीतून महामार्गावर जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे तेलीआळी, विद्यानगरमध्ये जाणारे नागरिक तसेच कणकवली महाविद्यालय, विद्यामंदिर हायस्कूल जाणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी जवळचा मार्ग म्हणून याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर वर्दळ असते. मात्र, या सार्‍यांना ये-जा करताना भंगारातील या वस्तूंचा सामना करतच पुढे जावे लागते. 

रस्त्यालगत सुमारे 80 ते 100 मीटर भागात भंगारातील साहित्य अस्ताव्यस्तपणे साठवून ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये सडलेल्या गाड्या, लोखंडी साहित्य अशा अनेक वस्तू पडलेल्या आहेत. तर साईडपट्टीवर भंगारातील दुचाकी, चारचाकी महिनोंमहिने तशाच लावलेल्या आहेत. त्यातच ग्रामीण भागातून भंगार घेवून येणारे टेम्पोेंची वर्दळ असतेच. त्याचबरोबर  साठवलेले भंगार भरून घेवून जाणार्‍या गाड्या अनेकवेळा रस्त्यालगतच उभ्या करून भरल्या जातात. अशावेळी ये-जा करणार्‍या नागरिकांबरोबरच दुचाकी, तीनचाकी वाहनातून ये-जा करणार्‍यांना याचा त्रास सहन करावा लागतो. 

भंगाराचा साठा करताना कोणत्या दक्षता घ्यायच्या याविषयी शासनाकडून निकष ठरवून देण्यात आले आहेत. विशेषत: पावसाळ्यामध्ये भंगारातील साहित्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने त्यामध्ये डासांची पैदास होवून साथरोग पसरण्याचा धोका असतो. दरवर्षी आरोग्य, नगरपंचायतीकडून भंगार व्यवसायिकांना हे भंगार झाकून ठेवण्यात यावे अशा सूचना दिल्या जातात. मात्र, व्यवसायिकांकडून तात्पुरत्या उपाययोजना करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शहरातील लोकवस्ती असलेल्या भागात हे भंगार साठवून ठेवलेले असल्याने आरोग्य विभागाच्या या सूचनांकडे खरे तर गांभीर्याने पाहत योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, तशा कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसून रस्त्यालगत हे भंगार उघड्यावरचअस्ताव्यस्तपणे टाकलेल्या स्थितीत आहे. 

कोणताही व्यवसाय करताना त्याचा नागरिकांना त्रास होवू नये याची खबरदारी घेणे तेवढेच महत्त्वाचे असते. मात्र, रस्त्यालगतच्या या भंगाराचा रहदारीला अडथळा होत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेकवेळा रस्त्यालगत सडलेले खिळे, लोखंडाचे तुकडे पडलेले असतात. यामुळे पादचार्‍यांना इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण? कणकवली शहराचा स्वच्छ सर्व्हेक्षणात देशात 36 वा नंबर आला आहे. अशा शहरातील एका रस्त्यालगत अस्ताव्यस्त पडलेले हे भंगार शहरासाठी भूषणावह आहे का? याचा विचार होणे आवश्यक आहे.कणकवली शहरासह लगतच्या गावांमध्ये भंगाराचे डेपो करण्यात आले आहेत. यातील बहुतांश डेपोंची स्थिती असून उघड्यावर भंगार साठवून ठेवण्यात आले आहे. नगरपंचायत व आरोग्य विभागाकडून वर्षातून एकदा नोटीस दिली जाते. त्या पलिकडे कोणतीही ठोस उपाययोजना प्रशासनाकडून केली जात नाही. 

नगरपंचायतीकडून दुर्लक्ष

रस्त्यालगत एखादा विक्रेता बसल्यास त्यावर कारवाईसाठी न.पं.चे कर्मचारी पुढे येतात. मात्र, वर्षानुवर्षे रस्त्यालगत हे भंगार पडलेले असून वाहतुकीस अडथळा होत असतानाही त्याकडे नगरपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे. न.पं.च्या या दुर्लक्षाविषयी नागरिकांमध्ये चर्चा असून याला वरदहस्त आहे का?