Tue, Mar 26, 2019 12:19होमपेज › Konkan › स्वच्छता व प्रशासकीय कामकाजात कणकवली पोलिस स्टेशन अव्वल

स्वच्छता व प्रशासकीय कामकाजात कणकवली पोलिस स्टेशन अव्वल

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 11:27PMकणकवली : प्रतिनिधी

पोलिस स्टेशनमध्ये येणार्‍या प्रत्येक नागरीकांमध्ये निर्भय आणि सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे याकरीता  केलेली पोलिस स्टेशनची स्वच्छता व रंगरंगोटी, दैनंदिन गुन्हे व कायदा व सुव्यवस्था सांभाळून केलेले निटनेटके प्रशासकीय कामकाज यामध्ये कणकवली पोलिस स्टेशन अव्वल ठरले आहे. याबाबत एप्रिल महिन्यात तपासणीसाठी आलेले कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक नवल बजाज यांनी कणकवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत व त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन केले आहे. 

याबाबत पोलिस महानिरीक्षकांनी पाठविलेल्या अभिनंदन पत्रात म्हटले आहे की, 18, 19 एप्रिल या कालावधीत आपण प्रत्यक्ष पोलिस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली होती. आपण दिलेल्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करून पोलिस स्टेशनमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी, प्रकाश व्यवस्था, अभिलेखांचे व्यवस्थित जतन कणकवली पोलिस स्टेशनने केले आहे. यामुळे पोलिस स्टेशनला येणार्‍या नागरीकांमध्ये निर्भय आणि सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे.

पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्येही दैनंदिन काम करण्यास उत्साह निर्माण होणार आहे. दैनंदिन घडणारे गुन्हे,  कायदा व सुव्यवस्था या बाबी सांभाळून प्रशासकीय कामकाजाकडेही गांभिर्याने लक्ष देण्यात आले आहे. त्याबद्दल आपण अभिनंदनास पात्र आहात. आपल्या पर्यवेक्षीय व कौशल्यपूर्ण कामगिरीची दखल घेऊन आपले व सर्व अधिनस्थ अधिकारी, अंमलदार यांचे अभिनंदन करतो व भविष्यातही चांगल्या कामाची अपेक्षा करतो असे विशेष पोलिस महानिरीक्षक नवल बजाज यांनी पाठविलेल्या अभिनंदन पत्रात म्हटले आहे.