Sat, Aug 24, 2019 23:16होमपेज › Konkan › कणकवली न. पं. निवडणूक शिवसेना स्वबळावरच!

कणकवली न. पं. निवडणूक शिवसेना स्वबळावरच!

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:37PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूकीत  शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर चर्चा होत असली तरी शिवसेनेच्या वरिष्ठांचा मात्र भाजपशी युती करण्यास विरोध असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  अर्थातच स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्याशी भाजपची असलेली सलगी हेच या मागचे कारण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या निवडणूकीत वरिष्ठांचा हिरवा कंदील मिळत नसल्याने शिवसेनेचे जिल्हा पातळीवरील नेते, पदाधिकारी स्वबळावर लढण्याच्याच निर्णयापर्यंत आल्याचे समजते. त्यासाठी संभाव्य उमेदवारांची यादीही शिवसेनेने निश्‍चित केली आहे. दरम्यान मिळालेल्या विश्‍वसनिय वृत्तानुसार गाव पॅनेलने शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव दिला असून त्यावरही शिवसेना विचार करत असल्याचे समजते. 

कणकवली नगरपंचायतीची निवडणूक यावर्षी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे रंगतदार होणार हे आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत  प्रमुख पक्ष आहेत ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, भाजप आणि शिवसेना. यांच्यातच खर्‍या अर्थाने लढत होणार आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही निवडणूक रिंगणात असणार आहेत. मनसेनेही निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. 

या निवडणुकीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रथमच गावविकास पॅनेल या निवडणूकीत उतरणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांंसमोर या पॅनेलने आव्हान निर्माण केले आहे. यापूर्वीच्या निवडणूकीत शिवसेना आणि भाजप यांनी युती केली होती. मात्र राज्यातील बदललेले राजकीय संदर्भ पाहता ही युती होईल की नाही याबाबत आता शंका व्यक्‍त केली जात आहे.  खरेतर शिवसेनेचे आ. वैभव नाईक आणि नगरसेवक सुशांत नाईक यांनी गेल्या काही महिन्यांपासून  या निवडणूकीच्या दृष्टीने जोरदार तयारी केली आहे.

असे असले तरी या निवडणुकीत भाजपतर्फे  संदेश पारकर हे स्वतः नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून उभे राहत असल्यास भाजपशी युती करण्याची तयारीही स्थानिक पातळीवर शिवसेनेची आहे. परंतु मिळालेल्या खात्रीलायक वृत्तानुसार शिवसेनेच्या वरिष्ठांचाच या निवडणूकीत भाजपशी युती करण्यास विरोध आहे. कारण स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांची  भाजपशी असलेली सलगी हेच या मागचे कारण असल्याचे सांगितले जाते. जर शिवसेनेने भाजपशी युती केली आणि उद्या जर भाजपने राणेंशी हातमिळवणी केली तर काय? असा प्रश्‍न वरिष्ठ स्तरावरून विचारण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जरी नेत्यांची भाजपशी युती करण्याची मानसिकता असली तरी वरिष्ठांच्या विरोधामुळे युती करणे अवघड असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या निवडणूकीत स्वबळावरच उतरण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे समजते. या दृष्टीने संभाव्य 17 ही उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपची भूमिका आता काय राहणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

दरम्यान, गाव विकास पॅनेलची भूमिकाही या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. मिळालेल्या विश्‍वसनिय वृत्तानुसार गाव पॅनेलने शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव दिला असल्याचे समजते. यामध्ये नगराध्यक्षपदासहित पाच जागांवर गावपॅनेलचे उमेदवार असतील तर 12 जागा शिवसेनेला सोडण्यात येतील. या प्रस्तावावरही शिवसेनेकडून विचारविनिमय सुरू असल्याचे समजते. तर तिकडे स्वाभिमान पक्षातर्फेही उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.गाव पॅनेलशीही संपर्क साधण्यात आल्याचे वृत्त होते.

मात्र, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. भाजपनेही शिवसेनेशी युती करणार की स्वबळावर लढणार याबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीही या निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. मात्र, या दोघांमध्ये आघाडी होणार की नाही हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कालच राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाने प्रदेश युवक उपाध्यक्ष अबिद नाईक यांना या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर चर्चेसाठी मुंबईला पाचारण केले होते. त्यांचीही भूमिका लवकरच स्पष्ट होईल.  त्यामुळे या सार्‍या लढतींबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. येत्या चार दिवसांत हे चित्र स्पष्ट होणार आहे.