Thu, Dec 12, 2019 09:20होमपेज › Konkan › ब्लॉग: ‘स्वाभिमान’ने पहिली लढाई जिंकली!

ब्लॉग: ‘स्वाभिमान’ने पहिली लढाई जिंकली!

Published On: Apr 12 2018 5:25PM | Last Updated: Apr 12 2018 5:25PM ‘स्वाभिमान’ने पहिली लढाई जिंकली!; संदेश पारकर यांची हार मात्र न परवडणारी- गणेश जेठे

कणकवली शहराची निवडणूक म्हटली की राणे विरूध्द संदेश पारकर असे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात उभे राहते. यावेळची निवडणूकही राणे विरूध्द संदेश पारकर अशीच लढली गेली. या लढाईचे स्वरूप मात्र यावेळी थोडेसे वेगळे होते. माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव आ.नितेश राणे यांच्याकडे संपूर्ण निवडणूक प्रचाराची सुत्रे होती. खरेतर आ.नितेश राणे हे अजुनही अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये असल्याने स्वाभिमान पक्षाच्या कुठल्याही सभेला अथवा प्रचारामध्ये उघडपणे कुठे दिसत नव्हते. तरीही  या लढाईमध्ये आ.नितेश राणे यांची ‘स्ट्रॅटेजी’ अधिक महत्वाची मानली जात होती आणि आताच्या निवडणूक निकालानंतर ते स्पष्टही झाले आहे. संदेश पारकर हे भाजपचे उमेदवार होते. ते नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलने निवडणुकीला सामोरे गेले होते. भाजपचा फौजफाटा त्यांच्या निवडणूक प्रचारात उतरला होता. भाजपला संदेश पारकर निश्चितपणे विजयी होतील असा विश्वाास वाटत होता. कारण संदेश पारकर यांचे वलय त्यांना विजय मिळवून देईल असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते. 

कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल गुरूवारी जेव्हा जाहीर झाला तेव्हा ही निवडणूक लढाई म्हणजे खरेच ‘काटे की टक्कर’ होती हे स्पष्ट झाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार समीर नलावडे हे केवळ 37 मतानी निवडून आले. कणकवली शहराच्या निवडणुकीतील हा विजय नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कणकवली शहराच्या निवडणुकीला नेहमीच महत्व राहीले आहे. या पार्श्वाभूमीवर स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्यासाठीही या निवडणुकीतील विजय महत्वाचा आहे. या निवडणुकीत राणे यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविणे क्रमप्राप्तच होते. गेल्या वर्षभरात राणे यांच्या बाबतीत घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वचभूमीवर हा विजय मिळाला नसता तर त्यांना टिकेला सामोरे जावे लागले असते. परंतु यावेळी राणे यांनी या निवडणूक लढाईमध्ये कोणतीही कमतरता ठेवली नाही. अगदी नगरसेवक पदाचे उमेदवार कोण असावेत याचा बारीक अभ्यास करून उमेदवारी ठरविण्यात आली. नगरसेवकपदांसाठी स्वाभिमान पक्षाने ‘स्ट्राँग’ उमेदवार दिले ही त्यांची जमेची बाजू होती. त्याशिवाय ‘इन कॅमेरा’ प्रचार मोहीम आखण्यात आली आणि त्याची काटेकोर अंमलबजावणीही करण्यात आली. प्रत्येक प्रभागात निरीक्षक नेमण्यात आले. ही सर्व यंत्रणा काम करते की नाही हे पाहण्यासाठी आणखी काही लोक नेमले. सर्वात महत्वाचे म्हणजे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. 

विकासाच्या मुद्यापेक्षा ही निवडणूक शांततेत लढली जावी अशी भावना कणकवलीकर नागरीकांची सुरूवातीपासूनच होती. याची पूर्ण कल्पना सर्वच राजकीय पक्षांना होती. त्यामुळे निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांपेक्षा निवडणूक लढविणार्याक उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रचारकांनीच घेतली होती. सभा, पत्रकारपरिषदांमध्ये मात्र राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. काही वेळा टीका करताना पातळीही घसरली होती. परंतु उमेदवार आणि काही नेते हे वातावरण बिघडू नये याची काळजी घेत होते. अगदी मतदानाच्या दिवशी अनेक नेत्यांनी एकमेकाला हस्तांदोलन करून वातावरण खेळीमेळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. नेहमी राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कणकवलीने निवडणूक देखील शांततेत कशी लढवावी हे महाराष्ट्राला या निमित्ताने दाखवून दिले. 

अखेर ही लढाई राणे यांनी जिंकली. वैभववाडी नगरपंचायतीनंतर देवगड-जामसंडे या नगरपंचायतीच्या निवडणुका या मतदारसंघाचे आ. नितेश राणे यांनी आपली स्ट्रॅटेजी वापरत जिंकली होती. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक त्यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेचीच होती. कारण आणखी वर्षभरानंतर विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आ. नितेश राणे यांनी कणकवलीतही निवडणूक स्ट्रॅटेजी अधिक प्रभावीपणे राबविली.त्यात त्यांना मोठे यशही मिळाले. कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय केंद्र मानले जाते. मुंबई-गोवा महामार्गावरील ही एक मोठी व्यापारी पेठ आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकणे राणे यांना राजकीयदृष्ट्या महत्वाचे वाटत होते. कणकवली शहराची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जिंकल्याने आ.नितेश राणे यांच्यासाठी पुढील विधानसभा निवडणूक लढविणे सोपे जाईल असेही म्हटले जाते. म्हणूनच या विजयाचे श्रेय स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आ.नितेश राणे यांना देवून जल्लोष साजरा केला आणि स्वत: खा.नारायण राणे यांनी मुंबईतून तातडीने कणकवलीत येवून आ.नितेश राणे यांचे कौतुकही केले.

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप हे मित्रपक्ष एकमेकाविरूध्द गरळ ओकत असताना कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मात्र शिवसेना-भाजपची युती झाली होती. शिवसेनेने आपले नगराध्यक्षपदाचे दावेदार सुशांत नाईक यांना मागे घेवून संदेश पारकर यांच्यासाठी भाजपला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यास मान्यता दिली होती.संदेश पारकर यांची गेल्या पंचवीस वर्षाची राजकीय कारकिर्द याच कणकवली शहरात घडली होती. ते अनेकदा कणकवलीचे सरपंच आणि नगराध्यक्ष होते. राणे यांच्याशी लढणारा एक लढवय्या युवा नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख होती. यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती आणि आता येणार्या  निवडणुकीत संदेश पारकर विधानसभा निवडणुकीतील प्रभावी उमेदवार असतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. परंतु राजकीय प्रवाहात राहण्यासाठी आणि आपले होमपीच टिकवून ठेवण्यासाठी संदेश पारकर स्वत: नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले. निवडणूक प्रचार काळात पत्रकारांशी चर्चा करताना ‘ मी कणकवलीत गेल्या 25 वर्षात खुप कामे केली, त्यामुळे कणकवलीकर जनतेचा माझ्यावर विश्वास आहे, आणि आपण सहज मोठे मताधिक्य घेवून विजयी होवू’ असा विश्वावस त्यांनी व्यक्त केला होता. परंतु सदासर्वकाळ राजकारणाचे स्वरूप तसेच राहत नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत एकच स्ट्रॅटेजी वापरून चालत नाही. ती कालानुरूप बदलावी लागते. सोबत असलेल्या माणसांची भुमिकाही बदलत राहते. या बदलत्या राजकीय परिस्थितीचे गणित कदाचित जुळले नसावे आणि या बिघडलेल्या गणिताचा फटका संदेश पारकर यांना बसला असावा. नगराध्यक्षपदी  म्हणून काही प्रभागांमध्ये युती झाली मात्र काही प्रभागांमध्ये भाजप-शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत झाली. अर्थात ही मैत्रीपूर्ण लढत भाजप-शिवसेनेच्या अंगलट आल्याचे म्हटले जाते. कोणी कोणासाठी मते मागायची या गोंधळाचा फटका संदेश पारकर यांना बसल्याचे सांगितले जाते. त्याशिवाय केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजप सरकारबाबत जीएसटी, नोटाबंदी यासारख्या धोरणात्मक निर्णयामुळे लोकांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्याचा फटकाही पारकर यांना बसल्याचे नाकारता येणार नाही. 

या निवडणूक निकालाने राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात ‘स्टार्टअप’ मिळाला आहे. मात्र त्याचवेळी साडेतीन वर्षांपूर्वीच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात घोडदौड सुरू ठेवलेल्या भाजप-शिवसेनेला ‘ब्रेक’ लागला आहे. भाजपचे नेते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्यापासून जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आ.राजन तेली, अतुल रावराणे या भाजपच्या स्थानिक नेत्यापर्यंत सर्वजण एकत्र येवूनही भाजपला कणकवली शहरात केवळ 3 नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले आहे. संदेश पारकर हे जिल्हास्तरावर राजकारणात सक्रीय असणारे नेतृत्व आहे. कणकवली शहरात आणि जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या होम पीचवरच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने भाजपचे जसे नुकसान झाले आहे तसेच संदेश पारकर यांचेही राजकीय नुकसान झाले आहे. पारकर यांचा हा पराभव जसा भाजप-शिवसेना युतीला परवडणारा नाही तसाच तो संदेश पारकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही परवडणारा नाही. त्यामुळेच संदेश पारकर यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल हेही औत्सुक्याचेच ठरेल.

Tags: Kankavli Nagar Panchayat, swabhimaan paksh, Election