Thu, May 23, 2019 15:09
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › स्वाभिमान, शिवसेना, काँग्रेस पक्षात तिरंगी लढत 

स्वाभिमान, शिवसेना, काँग्रेस पक्षात तिरंगी लढत 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : अक्षय पावसकर 

कणकवली नगरपंचायत हद्दीतील प्रभाग 5 मध्ये विद्यानगर तसेच कणकवली न.पं.इमारत, विद्यामंदिर हायस्कूल, खरेदी-विक्री संघ, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय यांचा समावेश आहे.ओबीसी महिलांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागात स्वाभिमान, शिवसेना,काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे.हा प्रभागही अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे.

या प्रभागात एकूण 645 मतदार असून 306 पुरुष तर 339 महिला आहेत. यामध्ये स्वाभिमानाच्या मेघा अजय गांगण, शिवसेनेच्या अश्‍विनी गजानन मोर्ये, काँग्रेसच्या ऋतुजा ऋषिकेश कोरडे या रिंगणात आहेत.या उमेदवारांपैकी शिवसेना व काँग्रेसचे उमेदवार नवखे असून स्वाभिमान पक्षाच्या मेघा गांगण या 2 टर्म याच प्रभागातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा प्रभाव असला तरी नवखे उमेदवार त्यांना कशा प्रकारे टक्‍कर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

मोठमोठी कॉम्प्लेक्स,घरांची दाटी असलेल्या या प्रभागात ढालकाठी ते तहसील कार्यालयपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे महत्त्वाचे विकासकाम मार्गी लागले आहे. यामुळे या मार्गावर येणार्‍या शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना बाजारपेठेत येणे-जाणे सोईचे झाले आहे. मात्र विद्यानगर अंतर्गत भागातील पायवाटा, रस्ते अद्यापही रखडले आहेत.संजीवनी हॉस्पिटल ते तेलीआळी रस्ता शहरविकास आराखड्यात आहे. मात्र, तोही पूर्णत्वास नेला नसल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. उघडी गटारे तसेच सांडपाण्याचाही प्रश्‍न या प्रभागात कायम आहे.

तसेच या प्रभागात येणार्‍या नगरपंचायतीचे बहुउद्देशीय सभागृहात सुविधांचा अभाव आहे.बॅटमिंटन कोर्ट,इनडोअर गेमसाठी रचना,व्यायाम शाळा आदींची बांधणी केली आहे.मात्र यात फक्‍त बॅटमिंटन कोर्ट सुरू आहे.तर व्यायामशाळेत भंगार साहित्य ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.विद्यामंदिर हायस्कुल ते शाळा क्र 5 पर्यंत रखडलेला रस्ता व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

Tags : Kankavli Nagar Panchayat Election, Swabhiman, Shiv Sena, Congress, Tri party fight,


  •