Wed, Jul 17, 2019 18:26होमपेज › Konkan › आ. नितेश राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक!

आ. नितेश राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

आ. नितेश राणे यांच्या कणकवलीतील विधानसभा मतदारसंघातील सर्वांत मोठ्या कणकवली या शहराच्या नगरपंचायतीची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. एक-दीड वर्षाने होणार्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही रंगीत तालीमच म्हणावी लागेल. मतदारसंघात पािॅझटीव्ह मेसेज जावा यासाठी कणकवली शहराच्या निवडणुकीत त्यांना विजय मिळवावा लागणार आहे. गेल्या दोन वर्षात झालेल्या वैभववाडी आणि देवगड नगरपंचायत निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर आ. नितेश राणे यांची कणकवली निवडणुकीत वापरली जाणारी ‘स्ट्रॅटेजी’ किती यश मिळवून देते हे औत्सुक्याचे आहे. 

कणकवलीच्या निवडणुकीची सूत्रे आ. नितेश राणे यांनीच हाती घेतल्याचे सांगण्यात येते. आपल्या उमेदवारांची संपूर्ण प्रचार यंत्रणा तेच राबवत आहेत. कणकवली नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या दोन निवडणुका राणे विरुद्ध संदेश पारकर अशाच लढल्या गेल्या. मात्र, गेल्यावेळच्या निवडणुकीत राणे आणि पारकर एकत्र होते. आता या निवडणुकीत पुन्हा एकदा कणकवलीत राणे विरुद्ध पारकर अशीच निवडणूक लढाई आहे. कणकवली शहराच्या या निवडणुकीत सध्या प्रचारासाठी कोणताही असा वातावरण निर्माण करणारा मोठा मुद्दा नाही. अतिशय शांततेत निवडणूक सुरू आहे. अशा परिस्थितीत निवडणूक स्ट्रॅटेजी तितक्याच कौशल्याने हाताळावी लागणार आहे.

दोन वर्षांपूर्वी वैभववाडी आणि त्यानंतर देवगड-जामसंडे या नव्या नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. 2014 च्या निवडणुकीत आ. नितेश राणे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या कणकवली या मतदारसंघातील वैभववाडी, देवगड आणि कणकवली या तीनही शहरांच्या नगरपंचायतींच्या निवडणुका जिंकणे महत्त्वाचे आहे.

वैभववाडी शहराच्या नगरपंचायत निवडणुकीत आ. नितेश राणे स्वतः वैभववाडीत ठाण मांडून होते. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विकासाच्या प्रश्‍नांवर तेथील लोकांशी चर्चा केली. उमेदवारांना मार्गदर्शन केले. या निवडणुकीत राणे यांना काठावर बहुमत मिळाले. मात्र, त्यांनी शेवटी वैभववाडीत सत्ता काबीज केली. देवगड नगरपंचायत निवडणुकीतही आ. नितेश राणे यांनी तशाच प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली. देवगड-जामसंडेमध्येही निवडणूक काळात ते बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवून होते. देवगड व जामसंडे शहरातील समस्या कोणत्या आहेत? आणि त्यावर काय मार्ग काढता येतील? याचा अभ्यास करून त्यादृष्टीने तेथील नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. तेथील विविध स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधला आणि आ. राणे यांनी अपेक्षेपेक्षा जास्त यश देवगडमध्ये मिळवले. आता कणकवली या मोठ्या शहराच्या निवडणूक प्रचाराची सूत्रे त्यांनी हाती घेतली आहेत. 

12 हजारांपेक्षा अधिक मतदारसंख्या कणकवली शहरामध्ये आहे. सिंधुदुर्गातील मुंबई-गोवा महामार्गावरील वसलेले हे एक मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष्य कणकवली शहरातील राजकीय हालचालींकडे नेहमी असते. आताही कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत महाराष्ट्रात चर्चा सुरूच आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात विविध मुद्यांवर आवाज उठवून चर्चेत असणार्‍या आ. नितेश राणे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. अलिकडेच पत्रकार जेव्हा आ. नितेश राणे यांना भेटले तेव्हा त्यांनी पुढीलवर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीची आपण तयारी करत आहोत, असे सांगितले. अर्थात या तयारीबाबतचा तपशील त्यांनी सांगितला नसला तरीदेखील पुढील एक-दीड वर्षात मतदारसंघात दौरे करून आजपर्यंत केलेली विकासकामे आणि भविष्यातील विकास प्रकल्पांसंदर्भात लोकांशी संवाद साधणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कणकवलीची ही लढाई जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे? याचाही कानोसा घेतला जात आहे.

कणकवली शहरामध्ये अद्यापही विकासाच्या अनेक समस्या आहेत आणि आ. राणे यांचे जे उमेदवार आहेत ते यापूर्वी केव्हा ना केव्हा कणकवलीमध्ये सत्तेत होते. त्यामुळे न सुटलेल्या प्रश्‍नांबाबत त्यांची भूमिका काय असेल? आणि त्यावर ते मतदारांचे समाधान करण्यासाठी काय उत्तर शोधतात हेही महत्त्वाचे आहे. आता मतदानाला केवळ सहा-सात दिवस शिल्लक आहेत. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा अथवा मेळावे झालेले नाहीत. घरोघरी प्रचार सुरू आहे. आ. नितेश राणे हेही आपल्या निवासस्थानी आपल्या उमेदवारांशी चर्चा करून रणनितीचा अवलंब करत आहेत. तिथूनच प्रचारयंत्रणा राबवत आहेत. एक आमदार म्हणून कणकवलीकर जनता त्यांच्या या प्रचाराला कसा प्रतिसाद देते हे 7 एप्रिल रोजीच्या निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

Tags : Kankavli Nagar Panchayat Election, Nitesh Rane, Reputation, election,


  •