Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Konkan › ट्रकची धडक बसून मोटारसायकलस्वार ठार

ट्रकची धडक बसून मोटारसायकलस्वार ठार

Published On: Aug 08 2018 10:32PM | Last Updated: Aug 08 2018 10:09PMकणकवली : प्रतिनिधी

जानवली येथून कणकवलीच्या दिशेने येत असलेल्या मोटारसायकलला मागून येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रकखाली चिरडून मोटारसायकलस्वार नंदकिशोर शशिकांत ढेकणे (वय 40, रा. जानवली-वाकाडवाडी) हा जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दु. 1.05 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली-तरंदळे फाट्यानजीक घडला. या अपघाताची भीषणता एवढी होती की, नंदकिशोरच्या डोक्यावरूनच ट्रकचे चाक गेल्याने अक्षरश: रक्ताचा सडा रस्त्यावर पडला होता.

नंदकिशोर ढेकणे हा जेवणाचे डबे पोहोचविण्याचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असे. बुधवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे डबे घेऊन कणकवलीत बाजाराच्या दिशेने येत होता. त्याच वेळी मागून कणकवलीकडे येत असलेल्या सिमेंटवाहू ट्रकची नंदकिशोरच्या मोटारसायकलला धडक बसली आणि तो मोटारसायकलवरून उजव्या बाजूला कोसळला. त्याचवेळी ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून एका बाजूच्या हातापायावरून गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. 

चेहर्‍याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याने त्याची ओळख पटविणे कठीण झाले होते. मात्र त्याच्याकडील मोबाईल व अन्य माहितीवरून त्याची ओळख पटली. अपघाताची खबर मिळताच वाहतूक पोलिस हवालदार प्रकाश गवस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रूग्णवाहिका तातडीने बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविला. अपघाताची भीषणता पाहून अक्षरश: अंगावर काटा येत होता. या अपघात प्रकरणी ट्रकचालक सुरेश धनाजी गुडके (24, भुदरगड-कोल्हापूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरूध्द हयगयीने व बेदखलपणे वाहन चालवून मोटारसायकलस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवलीच्या पोलिस उपनिरीक्षक जयश्री पाटील या करत आहेत.
नंदकिशोर ढेकणे याच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने जानवली परिसरात शोककळा पसरली आहे.