Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Konkan › भाजप शिवसेना सरकारकडून जनतेची फसवणूक

भाजप शिवसेना सरकारकडून जनतेची फसवणूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : वार्ताहर

वाढती महागाई, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, खड्डेमय रस्ते अशा अनेक समस्यांनी जनता त्रस्त असून भाजप-शिवसेना युतीचे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. पोकळ आश्‍वासने आणि जाहिरातबाजी करून हे सरकार जनतेची फसवणूक करत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत नायब तहसीलदार रवींद्र कडुलकर यांना निवेदन देण्यात आले.  

 राष्ट्रवादीचे  युवक प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी हे आंदोलन छेडण्यात आले.  जिल्हा सरचिटणीस राजेश पाताडे, तालुकाध्यक्ष विलास गावकर, ग्राहक सरंक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, शहर अध्यक्ष इम्रान शेख, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, उपाध्यक्ष सागर वारंग, अमित केतकर, गणेश चौगुले, सचिन अडुळकर, सचिन सदडेकर, सत्यवान कानडे, धनंजय पाताडे, दीपेश सावंत, अभय गावकर, अंकुश मेस्त्री, बाळू मेस्त्री, जहीर फकीर आदी उपस्थित होते. 

यावेळी सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्‍न राष्ट्रवादीकडून मांडण्यात आले. तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे, शासकीय रुग्णालयात औषध पुरवठा नाही, महागाई गगनाला भिडली आहे, गॅस, पेट्रोेलच्या किंमतींसह रोजच्या वापरातील जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढतच चालले आहे, गुन्हेगारीही वाढत आहे, महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे, रस्त्यांवरील खड्डे हे नेहमीचेच दुखणे बनले आहे अशा अनेक समस्या अबिद नाईक यांनी मांडल्या. या समस्या मार्गी लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवाव्यात, येत्या काही दिवसांत  समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या साथीने संघर्ष करेल, असा इशारा अबिद नाईक यांनी दिला.