Wed, Jul 24, 2019 14:27होमपेज › Konkan › शाळकरी मुलीवर अत्याचारप्रकरणी तिघांना अटक

शाळकरी मुलीवर अत्याचारप्रकरणी तिघांना अटक

Published On: Apr 10 2018 10:33PM | Last Updated: Apr 10 2018 9:39PMकणकवली : प्रतिनिधी

14 वर्षाच्या शाळकरी मुलीचा मोटरसायकलने पाठलाग करून तिला जबरदस्तीने गाडीवर बसवत शाळेत सोडतो असे सांगून लॉजवर नेवून दोघांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी त्या पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. ही घटना 7 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत घडली.

केतन म्हाडेश्‍वर (29, कसाल), शैलेश शिंदे (30, कसाल), तुषार चव्हाण (22, वायंगवडे-मालवण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघांना सायंकाळी ओरोस जिल्हा न्यायालयात हजर केले असता यापैकी केतन म्हाडेश्‍वर आणि शैलेश शिंदे यांना दोन दिवसांची तर तुषार चव्हाण याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. 

पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, संशयित केतन म्हाडेश्‍वर हा तिच्या पाठीमागून मोटरसायकलने आला आणि त्याने जबरदस्तीने गाडीवर बसवून शाळेत सोडतो असे सांगून लॉजवर सकाळी 8 वा. नेले. तेथे त्याने दुसरा संशयित शैलेश शिंदे याला आपल्या मोबाईलवरून फोन करून बोलावून घेतले आणि तो आल्यावर दोन्ही आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर संशयित केतन म्हाडेश्‍वर याने आपल्या मोबाईलवर तिचे फोटो काढले.  

तिघाही संशयितांनी आपापल्या मोटरसायकलने ऊसाच्या रसाच्या दुकानात येवून ऊसाचा रस पीडित मुलीला दिला. त्यानंतर केतन म्हाडेश्‍वर शैलेश शिंदे हे निघून गेले. त्यावेळी तिसरा संशयित तुषार चव्हाण याने आपला मोबाईल नंबर कागदावर लिहून पीडित मुलीला दिला आणि तू छान दिसतेच असे सांगून मी तुला नंबर दिला आहे हे कुणाला सांगू नको, सांगितले तर तुला मारणार अशी धमकी देवून गेला.

या घटनेची फिर्याद सोमवारी रात्री त्या पीडित युवतीने कणकवली पोलिस स्थानकात दिल्यानंतर मंगळवारी सकाळी आरोपींना कणकवली पोलिसांनी अटक केली. सायंकाळी त्यांना ओरोस जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.  संशयित आरोपीच्यावतीने अ‍ॅड. उमेश सावंत व अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. याप्रकरणी अधिक तपास कणकवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिता पवार करत आहेत.