Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Konkan › एसटी भरती यादीची फेरतपासणी करा ः सावंत

एसटी भरती यादीची फेरतपासणी करा ः सावंत

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:19PM

बुकमार्क करा

कणकवली ः वार्ताहर

एसटी सिंधुदुर्ग विभागातील चालक कम वाहक भरतीसाठी करण्यात आलेली निवड यादी सदोष आहे. काही उमेदवारांना मेरीटपेक्षा जास्त गुण असूनही डावलण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांच्या गुणांसह यादीची फेर तपासणी करा,  नवीन यादी 20 डिसेंबरला मिळाली पाहीजे, अशी आग्रही मागणी करत तोपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करू नये, असे सिंधदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांना सांगितले. यादीची फेरतपासणी करून ती 20 डिसेंबर पर्यंत दिली जाईल, अशी ग्वाही विभाग नियंत्रक हसबनीस यांनी दिली. 

सिंधुदुर्गातील एसटी विभागातील चालक कम वाहक पदाच्या भरती प्रक्रियेवरून गेले काही दिवस वाद सुरू आहे. निवड करण्यात आलेली 324 उमेदवारांची यादी सदोष असल्याचे उघड झाले होते. मेरीट पेक्षा जास्त गुण असतानाही उमेदवारांना डावलण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक उमेदवारांवर अन्याय झाल्याने निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करायचे नाही, अशी भूमिका मराठा महासंघाकडून घेण्यात आली होती. गेले महिनाभर हे प्रशिक्षण बंद आहे. दरम्यान, मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहावर सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड झालेले तसेच प्रतीक्षा यादीतील व सदोष यादीमुळे फटका बसलेले असे सर्वच उमेदवार एकत्र आले. पं. स. सदस्य मंगेश सावंत, माजी पं. स.सदस्य सुशील सावंत, अनिल साटम, दामू सावंत, अशोक राणे आदी उपस्थित होते. 

भरतीसाठी निवड झाल्याने आमच्या पूर्वीच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यातच महिनाभर प्रशिक्षणही बंद आहे. आमच्यावर आमचे कुटुंब अवलंबूनआहे.  अशा परिस्थितीत काय करायचे? प्रशिक्षण सुरू करण्यात यावे व अन्याय झालेल्या उमेदवारांचा लढा सोबतच सुरू ठेवावा अशी भूमिका निवड झालेल्या उमेदवारांनी मांडली.  प्रशिक्षण सुरू केल्यास इतरांचा विचार होणार नाही. काहींना चुकीच्या पध्दतीने गुण दिले गेले आहेत. 2015 च्या प्रतिक्षायादीतील उमेदवारांची निवड झालेली नाही, अशी भूमिका डावलेल्या उमेदवारांनी मांडली. याबाबत तोडगा काढताना सतीश सावंत यांनी निवड झालेल्या 324 उमेदवारांमध्ये सुमारे  160 हे जिल्ह्यातीलच आहेत. त्यांचाही विचार व्हायला हवा.

तसेच सदोष यादीमुळे अन्याय झाला आहे त्यांनाही न्याय मिळायला हवा. यावर सदोष यादीची फेरतपासणी करून अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देणे तसेच प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांची निवड करणे यासाठी आपण राजकारण विरहीत सर्व पक्षीय खासदार, आमदार लोकप्रतिनिधींच्या  माध्यमातून  एकत्रित प्रयत्न करूया, असे सांगितले.  सुमारे दिड तास दोन्हीबाजूकडून झालेल्या चर्चेनंतर सतीश सावंत यांनी मांडलेल्या पर्यायावर सर्वांनी एकमत दर्शविले. त्यानंतर दोन्ही बाजूकडील उमेदवारांसह सतीश सावंत यांनी एसटी विभागीय कार्यालयात जाऊन विभागनियंत्रक चेतन हसबनीस यांची भेट घेतली. कर्मचारी वर्ग विभागीय अधिकारी ल.रा.गोसावी उपस्थित होते.  सदोष यादीची फेरतपासणी करून नवीन यादी 20 डिसेंबर पर्यंत देण्याचा अल्टीमेट देतानाच सतीश सावंत यांनी सिंधुदुर्ग विभागातील 769 जागांसाठी भरती झाली असताना केवळ 324 उमेदवारांची निवड झाली आहे. त्यामुळे प्रतीक्षायादीतील सर्व उमेदवारांची निवड व्हायला हवी अशी भूमिका विभाग नियंत्रक हसबनीस यांच्यासमोर मांडण्यात आली. या विषयावर 20 डिसेंबरला 3 वा. पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.