Sat, Apr 20, 2019 10:30होमपेज › Konkan › वर्षा पर्यटनासाठी खुणावताहेत कुंभवडेतील धबधबे

वर्षा पर्यटनासाठी खुणावताहेत कुंभवडेतील धबधबे

Published On: Jul 28 2018 11:01PM | Last Updated: Jul 28 2018 10:20PMकणकवली : वार्ताहर

निसर्गसौंदर्याने नटलेले आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कुंभवडे गावच्या तिन्ही बाजूला उंच उच पर्वतरांगा आहेत. पावसाळ्यात कडेकपारीतून कोसळणार्‍या धबधब्यांची रांग, दाट धुके, कोसळणारा पाऊस, हिरवी गर्द वनराई असे विलोभनीय  दृष्य पहायला मिळते. यातील टाक्याचा धबधबा व रांजणीचा काप या धबधब्यापर्यंत  जाण्यासाठी पक्के रस्ते आहेत. वर्षा पर्यटनासाठी कुंभवडेतील हे धबधबे निश्‍चितच पर्यटकांसाठी आनंददायी आहेत. पर्यटकांना खुणावणारे हे धबधबे व परिसराचा विकास करण्याचा कुंभवडे ग्रामस्थांचा मानस आहे.

कणकवली शहरातून नरडवे रोडने निघाल्यानंतर कनेडी बाजारपेठेपासून काही अंतरावर गेल्यानंतर मल्हार नदी पुलाच्या अगोदर डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो कुंभवडे गावात पोहोचतो. कणकवली ते कुंभवडे हे अंतर सुमारे 18 कि.मी.  आहे. कनेडी बाजारपेठेतून रिक्षा किंवा खासगी वाहनाने कुंभवडेत जाता येते. शिवाय कणकवली डेपोतून एसटी बस कुंभवडे गावापर्यंत सोडल्या जातात. देवगड डेपोतूनही एक एसटी कुंभवडेपर्यंत सोडण्यात आली आहे. गावात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूला वाहणारी मल्हार नदी, तेथून पुढे गेल्यानंतर श्री देव महालिंगेश्‍वराचे सुंदर असे मंदिर दिसून येते. पुढे जात असताना सह्याद्रीच्या कुशीत जात असल्याचा भास होतो. तीन्ही बाजूला असलेल्या डोंगर दर्‍यांमधून धबधबे कोसळताना दिसतात. त्यात घोरोडे, पातकुल व त्याच्या बाजूला धबधब्यांचा राजा मुसळा वझर लक्ष वेधून घेतात.  

कुंभवडे गावातील काही धबधब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांची सुविधा उपलब्ध आहे. रस्ता संपल्यानंतर पाच ते दहा मिनिटे पायी चालत गेल्यास धबधब्यापर्यंत पोहोचला येते. या धबधब्यांचा पर्यटन विकास करण्यासाठी कुंभवडे ग्रामविकास संस्था मुंबई आणि ग्रामपंचायत कुंभवडे यांनी पुढाकार घेतला असून  विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिक तरुण आणि  महिला बचत गटांना प्रोत्साहन देत वर्षा पर्यटकांना विविध सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत.

पर्यटकांना चहा, नाश्ता, शाकाहारी, मांसाहारी जेवण, रानभाज्या, पर्यटकांच्या पसंतीनुसार चुलीवरचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.  यातूनच स्थानिक बेरोजगार तरुणांना काही प्रमाणात रोजगार निर्माण होईल. त्याचबरोबर पर्यटकांसाठी प्रवासी वाहनांची सोय केली जाणार आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात जात धबधबे आणि ग्राम जीवनाचा आनंद घेवू इच्छिणार्‍यांसाठी कुंभवडेतील हे धबधबे निश्‍चितच सोयीचे ठिकाण आहे. स्थानिक ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळींकडून सध्या या धबधब्यांचा आनंद घेत आहेत. निसर्गाचा आनंद घेताना दाट धुके आणि पावसात ओलेचिंब होत धबधबे अंगावर घेत वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कुंभवडेतील या धबधब्यांना अवश्य भेट द्या, असे आवाहन कुंभवडे ग्रामविकास संस्था मुंबईचे अध्यक्ष लक्ष्मण बाळकृष्ण सावंत यांनी केले आहे.