Sun, May 26, 2019 18:40होमपेज › Konkan › आठवडा बाजारात 250 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त 

आठवडा बाजारात 250 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त 

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 10:31PM

बुकमार्क करा
कणकवली ः शहर वार्ताहर 

कणकवली शहरात 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची बंदी असताना या नियमाचे उल्लंघन करत आठवडा बाजारात काही व्यापारी खुले आम पिशव्या विक्री करत असल्याने कणकवली न. पं. ने मंगळवारी शहरात धडक मोहीम राबवली. मायक्रो मीटर यंत्राद्वारे तपासणी करून सुमारे 70 ते 80 विक्रेत्याकडून व 4 होलसेल व्यापार्‍यांकडून 250 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच फूटपाथवर व फूटपाथ बाहेर अनाधिकृत बसलेल्या फळ, भाजी, चप्पल आदी विक्रेत्याच्या छत्र्या जप्त केल्या व दुकाने काढण्यास सांगण्यात आले .  प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे. तसेच शहरातील कचर्‍यांचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे कणकवली न. पं. गेले 2 वर्ष 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर  बंदी घातली होती. यामुळे काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झाला होता. मात्र त्यानंतर  न. पं. ची कारवाईची मोहीम थांबली होती.

यामुळे  विक्रेते खुले आम प्लास्टिक पिशव्याचा वापर करू लागले. हे आढळून येताच न. पं. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी कर्मचार्‍यांना सोबत घेत कडक मोहीम राबवली.  पटकीदेवी ते पटवर्धन चौक तसेच हायवेवर बसलेल्या सर्व विक्रेत्याची तपासणी करण्यात आली. यापुढे संबंधिताकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास 500 रु. ते 5000 रु.पर्यंत  दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच 50 मायक्रॉनपेक्षा वरच्या सफेद रंगाच्या पिशव्या वापरण्यास परवानगी असून इतर कलरच्या पिशव्या आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. कचरा देताना प्लास्टिक पिशवीतून न देता तो बकेटमधूनच दिला जावा. असे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले . या कारवाईत  पथक प्रमुख  मनोज धुमाळे,अमोल भोगले, प्रवीण गायकवाड, प्रशांत राणे, तुषार कांबळी  आदी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.