होमपेज › Konkan › परमहंस भालचंद्र महाराजांचा आजपासून जन्मोत्सव सोहळा

परमहंस भालचंद्र महाराजांचा आजपासून जन्मोत्सव सोहळा

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 9:23PM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

योगियांचे योगी, अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा 114 वा जन्मोत्सव सोहळा बुधवार 3 ते 7 जानेवारी 2018 या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या उत्सवामुळे  कनकनगरी भालचंद्रमय होणार आहे. भालचंद्र महाराजांच्या 114 व्या जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून 114 दात्यांचा रक्तदान संकल्प करण्यात आला आहे. बाबांच्या जन्मोत्सोव सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुधवार 3 ते शनिवार 6 जानेवारी या कालावधीत पहाटे काकड आरती, समाधी पूजा, सकाळी 8 ते 12.30 या वेळेत परमहंस भालचंद्र महाराज दत्तयाग, दुपारी आरती, त्यानंतर महाप्रसाद, भजने, सायंकाळी 4 ते 8 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यानंतर आरती होणार आहे. रविवार 7 जानेवारी रोजी भालचंद्र महाराजांचा 114 वा जन्मदिन आहे.

यानिमित्त पहाटे काकड आरती, समाधी पूजा, जपानुष्ठान, त्यानंतर भजने, समाधीस्थानी लघुरूद्र होणार आहे. सकाळी 9.30 ते 12 या वेळेत ह.भ.प. भाऊ नाईक वेतोरे यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे. दुपारी 12 वा. परमहंस भालचंद्र महाराजांचा 114 वा जन्मसोहळा साजरा होणार आहे. दुपारी 12.30 वा. आरती त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी 5 वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची हत्ती, उंट, घोडे तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यासमवेत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर आरती आणि रात्रौ 12 नंतर कलेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचे दशावतारी नाटक होणार आहे. जन्मोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी भक्तांसाठी असणार आहे. यात 3 जानेवारी रोजी दुपारी 3.30 ते 6 या वेळेत कणकवली शाळा नं. 3 च्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

सायंकाळी बालकीर्तनकार ह.भ.प. सदाशिव पाटील (आंदुर्ले) यांचे समर्थ रामदास या विषयावर कीर्तन होणार आहे. 4 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते 4.30 या वेळेत अलगुजाचे हितगूज आणि बासरी वादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी अभंगवाणी आणि भक्तीसंगीताचा कार्यक्रम मनोज मेस्त्री, श्री. संदीप व सौ. तेजस्विता पेंडुरकर सादर करणार आहेत. 5 जानेवारी रोजी दापोलीतील अमेय आखवे यांचा स्वरसंध्या कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर कथ्थकसंध्या हा कार्यक्रमही होणार आहे. तरी या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.