Thu, Apr 25, 2019 21:28होमपेज › Konkan › कणकवली न.पं. निवडणुकीत काँग्रेस ताकदीने उतरणार

कणकवली न.पं. निवडणुकीत काँग्रेस ताकदीने उतरणार

Published On: Mar 09 2018 11:29PM | Last Updated: Mar 09 2018 10:54PMकणकवली: प्रतिनिधी

जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची वाटचाल जोमाने सुरू झाली आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने उतरणार आहे. ज्यांना आतापर्यंत जनतेने संधी दिली त्या घराण्यांनी केवळ स्वत:चाच स्वार्थ साधला, मात्र आम्ही कणकवली शहराच्या विकासाला खर्‍या अर्थाने न्याय देण्यासाठी कटीबध्द आहोत. एक समर्थ पर्याय आमचा पक्ष जनतेला देणार आहे, असा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी व्यक्त केला.

कणकवली नगरपंचायत निवडणूक पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी पटकीदेवी ते पटवर्धन चौकापर्यंत काँग्रेसने भव्य रॅली काढली. त्यानंतर पटवर्धन चौकात काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या रॅलीत प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, जिल्हा प्रवक्‍ते डॉ. जयेंद्र परूळेकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ. निता राणे, काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत, शहर अध्यक्ष विलास कोरगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कुंदा पै, सुगंधा साटम, सुधा हर्णे, प्रकाश जैतापकर, राजू मसुरकर, बाळा बांदेकर, अपी गवाणकर, संजय राणे, व्हि. के. सावंत, लिला बांदेकर आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजन भोसले म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने लोकशाही पध्दतीने इच्छूकांचे अर्ज मागवून घेतले. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी एकमेव विलास कोरगावकर यांचा अर्ज आला आहे. मात्र सतराही प्रभागातून एका एका जागेसाठी चार ते पाच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसबद्दल आजही जनतेच्या मनात तेवढेच आपुलकीचे स्थान आहे. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा उभारी घेत आहे. कणकवली न.पं. निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार आहेत. काँग्रेसकडे आलेल्या इच्छूकांच्या अर्जाची छाननी करून जिल्हा आणि प्रदेश पातळीवर विचारविनिमय करून अंतिम यादी जाहीर केली जाईल. जनतेसमोर काँग्रेस हाच एक समर्थ पर्याय आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील जनता पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे सिध्द होईल, असे भोसले यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करणार का? या प्रश्‍नावर राजन भोसले यांनी समविचारी पक्ष सोबत आल्यास आघाडी केली जाईल. अद्यापपर्यंत राष्ट्रवादीने तसा प्रस्ताव दिलेला नाही असे सांगितले.