Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Konkan › माकडांचा उपद्रवही चिंताजनक

माकडांचा उपद्रवही चिंताजनक

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 10:51PMकणकवली : अजित सावंत

समृध्द वनसंपदा लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होवू लागला आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून सिंधुदुर्गच्या दक्षिण पट्ट्यात रानटी हत्तींनी धुमाकुळ घालत काही जणांचे प्राण घेतले आणि कोट्यवधी रुपयांची शेती बागायतीची हानी केली. ही समस्या सुरू असतानाच सिंधुदुर्गात आता माकडांचा उपद्रवही तेवढाच चिंताजन बनला  आहे. पूर्वी सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्येच धुडगुस घालणारी माकडे आता थेट शहरातही धुमाकुळ घालत आहेत.  माकडांमुळे उन्हाळी शेती तसेच बागायत नको म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांंवर आली आहे. त्याचबरोेबर ही माकडे घरांच्या कौलारू छप्परांचे नुकसान करत असल्याने हत्तींप्रमाणेच माकडांचा उपद्रवही सिंधुदुर्गवासीयांसाठी डोकेदुखी बनला आहे.

कोकण हा मुळातच निसर्गाने भरभरून दिलेला भूप्रदेश.  इतर भागांच्या तुलनेत कोकणात अद्यापही जंगलांची स्थिती बर्‍यापैकी टिकून आहे. काही प्रमाणात चोरटी वृक्षतोड होत असली तरी वनसंपदेचे प्रमाण चांगले आहे. त्यातच गेल्या 25 वर्षांपासून राज्य शासनाच्या 100 टक्के अनुदानावरील फळझाड लागवड योजनेमुळे पडिक जमीन मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आली आहे. या जमिनीवर आंबा, काजू, नारळ व इतर फळपिकांची लागवड झाल्याने या फळझाडांच्या माध्यमातून काही प्रमाणात आर्थिक समृध्दीला सुरूवात झाली आहे. हे एकीकडे शुभवर्तमान असतानाच आता याच शेतीबागायतीवर डल्ला मारणार्‍या माकडांचा उपद्रव सिंधुदुर्गच्या सर्वच भागात वाढला आहे. पूर्वी सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये तुरळक प्रमाणात या माकडांचा वावर असे.

मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून या माकडांचा उपद्रव फारच वाढला आहे. नव्हे जंगलात हे माकड राहिनासे झाले आहेत. या माकडांबरोबरच लाल तोंडाची लहान आकाराची माकडे (केडली) सुध्दा उच्छाद करू लागली आहेत. माकडांच्या या उपद्रवामुळे केळी, नारळ, भाजीपाला किंवा इतर फळपिकांचे मोठे नुकसान होत आहे. उन्हाळी भाजीपाला तर आता करायलाच नको अशी स्थिती  आहे. पंधरा ते वीस जणांच्या टोळीने ही माकडे शेतात घुुसून भाजीपाला फस्त करू लागली आहेत.  शहाळी, नारळ तर ठेवतच नाहीत अशी स्थिती आहे.

शिवाय घरांच्या भिंती आणि छप्परामधील पोकळीतून जावून घरातील खाद्यपदार्थही खावू लागले आहेत. घरांच्या कौलारू छप्परांचेही या माकडांच्या उड्यांमुळे मोठे नुकसान होत आहे.  माकडांच्या उपद्रवामुळे घराजवळची आंब्याची धरती झाडे, कलमे, माड तोडण्याची वेळ लोकांवर आली आहे. परिणामी आर्थिक नुकसानही लोकांना  सोसावे लागत आहे. अलिकडेच कणकवली शहरानजीक एका गावातील दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या अंड्ड्याचा ट्रे माकडाने हातोहात लांबविला आणि काही अंतरावर  बसून अंड्ड्यांवर ताव मारला. 
पूर्वी फटाके लावले किंवा  डब्याचा आवाज केला तरी माकडे घाबरून किमान काही दिवस तरी परांगदा होत असत. मात्र, आता याही गोष्टींना माकडे सरावली आहेत. एकट्या दुकट्या महिलांच्या अंगावर जाण्यास माकडे मागे पुढे पाहत नाहीत.

वनखात्याने आता हा माकड उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज आहे. एकतर माकड पकड मोहीम राबवा किंवा माकडांना पुन्हा जंगलात परतवण्यासाठी काहीतरी उपाय आखा, अशी मागणी शेतकरी बागायतदारांकडून होवू लागली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कौलारू घरांची संख्या अधिक आहे. मात्र माकडे दणादण उड्या मारून घरांची कौले, कोने मोठ्या प्रमाणावर फोडू लागले आहेत. हे नुकसान सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.   त्यामुळे हत्तींप्रमाणेच माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी वनखात्याने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.  जिल्ह्यात गेले वर्षभर माकड तापामुळेदेखील अनेकांचे बळी गेले. त्यामुळे ही माकडे आता सर्वार्थाने माणसांची मोठी समस्या झाली आहे. 

माकडे जंगल सोडून मानव वस्तीकडे का येतात, याचाही विचार होण्याची गरज आहे. जंगलाना लागणारे वणवे आणि वृक्षतोड ही कारणे याला कारणीभूत आहेत. पूर्वी जंगलांमध्ये आंबा, जांभूळ, कोकम, बांबू, हसन, वटवृक्ष अशी पशुपक्षांचे खाद्य असलेली झाडे मुबलक प्रमाणात असत. मात्र वृक्षतोडीत ही झाडे राहिली नाहीत. वनखाते जंगलात जी वृक्ष लागवड करते ती आकेशिया, बाभूळ, निलगिरी यासारखी जलद वाढणारी झाडे असतात. मात्र, ही झाडे तृणभक्षक प्राण्यांकरिता उपयोगाची नाहीत. त्यामुळे वन्य प्राणी आता मानवी वस्तीकडे वळले आहेत. हे विस्कळीत अन्नसाखळीचे सारे दुष्परिणाम आहेत.