होमपेज › Konkan › जानेवारी अखेरीस व्याघ्रगणना

जानेवारी अखेरीस व्याघ्रगणना

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 9:27PM

बुकमार्क करा
कणकवली : अजित सावंत

संपूर्ण देशभरात येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस व्याघ्रगणना करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. यामध्ये वाघांबरोबरच इतर वन्य प्राण्यांचीही गणना केली जाणार आहे. महाराष्ट्रात 2010 मध्ये व्याघ्रगणना करण्यात आली होती. आता सात वर्षांनंतर ही गणना होत आहे. सिंधुदुर्गात येत्या 20 ते 26 जानेवारी दरम्यान ही गणना करण्याचे जवळपास निश्‍चित करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 55 हजार हेक्टर क्षेत्रावरील सरकारी जंगलातील 82 बीट निश्‍चित करून  ट्रान्झेक्शन लाईन (मध्यरेषा) टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या लाईनवरून पहिले सात दिवस वाघांसह मांस भक्षक प्राण्यांची आणि पुढील तीन दिवस तृणभक्षक प्राण्यांची गणना केली जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

सिंधुदुर्गची वनसंपदा नैसर्गिक विविधतेने बहरलेली आहे. जिल्ह्यातील जंगलांमध्ये बिबटे, सांबर, निलगाई, गवारेडे, हरिण, रानडुक्कर, तरस, रानकुत्रे, अस्वल, कोल्हे असे अनेक वन्यप्राणी आहेत. 2010 मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेवेळी सुमारे 15 बिबटे, 69 सांबर, 92 गवारेडे, 43 हरिण, 19 माऊसडिअर, 227 रानडुक्कर, 10 तरस, 39 कोल्हे, 3 रानकुत्रे असे वन्यप्राणी आढळले होते. अर्थात जंगलातील प्राण्यांची संख्या याहून अधिक आहे. बिबट्यांचाच विचार करत जवळपास 50 हून अधिक बिबटे जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे. तसेच काही वर्षांपूर्वी आंबोली, दोडामार्गच्या जंगलात पट्टेरी वाघाचेही अस्तित्व आढळून आले होते. तर मध्यंतरी आंबोलीत ब्लॅक पँथरचेही दर्शन झाले होते.

हे पाहता जिल्ह्यातील जंगलात तृणभक्षक प्राण्यांची संख्या निश्‍चितपणे समाधानकारक आहे असे म्हणता येईल. अभयारण्यातील व्याघ्रगणना साधारणपणे मे महिन्यात बुद्ध पौर्णिमेला केली जाते. आताची ही व्याघ्रगणना अभयारण्य वगळता इतर सरकारी जंगलांमध्ये होत आहे. संपूर्ण देशभरात जानेवारीच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात व्याघ्रगणना होऊ घातली आहे. त्यासाठी वनविभागाने जिल्ह्यातील वनअधिकारी, कर्मचार्‍यांना खास प्रशिक्षण दिले  आहे.