Wed, Nov 14, 2018 19:21होमपेज › Konkan › शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी आता ‘बालरक्षकांची’ नियुक्‍ती

शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी आता ‘बालरक्षकांची’ नियुक्‍ती

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 10:44PMकणकवली : प्रतिनिधी

शाळाबाह्य मुलांच्या अनेक प्रकारच्या समस्या लक्षात घेता अशा मुलांचा शोध घेवून त्यांना शाळेची गोडी लावण्यासाठी आता बालरक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात किमान दोन आणि आदिवासी भागात त्यांची बोलीभाषा जाणणार्‍या प्रत्येकी दोघांची निवड केली जाणार आहे. शहरी भागात प्रत्येक केंद्रासाठी पाचजण निवडले जाणार आहेत. कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही शाळाबाह्य मुले दिसत असल्याने राज्य शासनातर्फे शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी हा नवा निर्णय घेतला आहे.  बालरक्षकांची नियुक्‍ती करताना विषयाशी संबंधित संवेदनशिलता आणि स्वयंप्रेरणेने काम करण्याची तयारी यासाठी आवश्यक असणार आहे. 

स्थलांतरीत बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सन 2016 मध्ये संपूर्ण राज्यात एकाच दिवशी अशा मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी काही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्यक्रम देवून बालरक्षक ही संकल्पना पुढे आली आहे.