Sun, Apr 21, 2019 03:58होमपेज › Konkan › जिल्ह्याला वादळी पावसाचा फटका 

जिल्ह्याला वादळी पावसाचा फटका 

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 10:51PMकणकवली : प्रतिनिधी

वाढत्या उकाड्याने सिंधुदुर्गवासीय हैराण झाले असतानाच गुरुवारी सायंकाळी कणकवली, वैभववाडी, कुडाळ, देवगड तालुक्यांसह जिल्ह्यात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. विशेषतः सह्याद्री पट्ट्यात या वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे  दूरध्वनी आणि वीज यंत्रणा ठप्प झाली होती. वैभववाडी तालुक्यात वैभववाडी-गगनबावडा मार्गावर झाड कोसळ्याने, तर खांबाळे-दंड येथे रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वैभववाडी-फोंडा मार्ग ठप्प झाला होता. परिणामी, दोन्ही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कणकवली विभागात महावितरणलाही या वादळी पावसाचा तडाखा बसला. महावितरणची जवळपास 5 वीज उपकेंद्रे बंद पडल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. हुमरमळा येथे झाड पडल्याने मुंबई-गोवा महामार्ग तासभर ठप्प झाला होता. 

मागील आठवड्यात जिल्ह्याच्या अनेक भागांत धुवाँधार पाऊस झाल्यानंतर चार दिवस कोरडे होते. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे उष्म्यात प्रचंड वाढ झाली होती. गुरुवारी दुपारपासूनच मेघ दाटून आले आणि गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्गच्या सर्वच भागांत या पावसाने जोरदार हजेरी लावली. कणकवली, वैभववाडी, देवगडसह जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यात चक्रीवादळ झाले. त्यामुळे घरांवर, गाड्यांवर झाडे पडून हानी झाली. 

 वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून, झाडांच्या फांद्या तुटून वीज तारांवर व रस्त्यावर पडल्या. सह्याद्री पट्ट्यातील वैभववाडी, फोंडाघाट, भिरवंडे, नाटळ, नरडवे या भागांत जोरदार पाऊस झाला. खारेपाटण, नांदगाव, तळेरे भागांतही पाऊस झाला. वादळी पावसाचा तडाखा वीज आणि दूरध्वनी यंत्रणांना बसला. परिणामी, अनेक भागांत वीजपुरवठा ठप्प झाला होता. ऐन मे महिन्यात होत असलेल्या पावसामुळे आंबा, कोकम, जांभूळ या फळपिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षी आंबा हंगाम मुळातच लांबला होता. त्यातच कमी उत्पादन असल्याने आंबा मार्केटला आता कुठे सुरुवात झाली होती. मात्र, या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारी, शेतकरी आणि व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे. 

महावितरणची 5 वीज उपकेंद्र बंद

वादळी पावसाने गुरुवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार फटकेबाजी केली. वैभववाडी व कणकवली तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने  या दोन्ही तालुक्यांतील अनेक भागात वीजपुरवठा ठप्प झाला. वीज वाहिन्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. दुपारी साडेचारच्या सुमारास 
आलेले वादळ सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत सुरूच होते.प्राथमिक माहितीनुसार कणकवली विभागात शंभराहून अधिक विजेचे खांब पडले असून असलदे, कनेडी, खारेपाटण, फोंडा या 33/11 केव्ही वीज उपकेंद्राचा पुरवठा ठप्प झाला आहे. नुकसानीची नेमकी आकडेवारी शुक्रवारी स्पष्ट होईल. वादळ कमी होताच महावितरणने वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीज वाहिन्यांवर पडलेली झाडे व त्याच्या फांद्या हटविण्यास सुरुवात केली. 

पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. वीज कर्मचारी, अभियंते व बाह्यस्त्रोत कामगार यांची पथके तयार करण्यात आली आहेत. शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. दरम्यान ग्राहकांनी संयम राखून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व कणकवलीचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी केले आहे.