होमपेज › Konkan › प्रजा गारठतेय, ‘राजा’ मोहरतोय!

प्रजा गारठतेय, ‘राजा’ मोहरतोय!

Published On: Dec 16 2017 1:42AM | Last Updated: Dec 15 2017 9:39PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

गेला आठवडाभर पडणार्‍या गुलाबी थंडीत कोकणवासीय गारठायला लागले  असताना या उबदार दुलईत आता ‘कोकणचा राजा’ मोहरायला लागला आहे.  ‘ओखी’चे संकट टळल्यानंतर वातावरणात आवश्यकतेपेक्षा कमालीचा गरवा जाणवायला लागल्याने आंबा चांगलाच मोहरू लागला आहे. गेले तीन दिवस वातावरणात अनुकूल बदल झाले असून पारा 18 ते 16 अंश सेल्सियसपर्यंत घसरू लागल्याने रत्नागिरीतील बागायतदारांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.

‘ओखी’चे वादळ शमले असून त्याचा फारसा फटका रत्नागरीत न जाणवल्याने आता बागायतदारांनी आंब्याला अनुकूल ठरणार्‍या मोसमात कोकणच्या राजाच्या बेगमीवर लक्ष केंद्रित केेले आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला कोकण किनारपट्टीवर ‘ओखी’चे वादळ घोंगावत होते. याचा फटका कोकण किनार्‍यालगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला. त्याचा फारसा परिणाम रत्नागिरी आणि रायगडमध्ये  जाणवला नसला तरी त्यामुळे आलेल्या अवकाळी पावसाने आंब्यावर परिणाम  होण्याची भीती होती. मात्र, ‘ओखी’ शमल्यानंतर आता या आठवड्यात वातावरणात गारठा वाढू लागला आहे. वातावरण आंब्याला पोषक ठरू लगाण्याचे  संकेत बागायतदारांनी वर्तविले आहेत.  ‘ओखी’मध्ये झालेल्या पावसानंतर हा बदल झाल्याने बागायतदारांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.