Sun, May 26, 2019 20:52होमपेज › Konkan › वेंगुर्ले, कणकवलीची स्वच्छ सर्वेक्षणात बाजी

वेंगुर्ले, कणकवलीची स्वच्छ सर्वेक्षणात बाजी

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 9:54PMकणकवली : प्रतिनिधी

केंद्र सरकारने देशभरात स्वच्छतेला प्राधान्य देत शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2018 ही मोहीम राबविली होती. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि दीव-दमण या सहा वेस्टर्न झोनच्या राज्यातील 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणात सिंधुदुर्गातील वेंगुर्ले नगरपालिकेला 18 वा तर कणकवली नगरपंचायतीला 36 वा क्रमांक मिळाला आहे. या दोन्ही शहरांना प्रत्येकी 5 कोटींचे बक्षीस मिळाले आहे. या दोन्ही शहरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधानांनी स्वच्छतेला अधिक महत्त्व देत ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हे घोषवाक्य वापरून देशभर स्वच्छताविषयक जनजागृती करण्यासाठी पावले उचलली. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छ सर्वेक्षण 2018 ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये देशातील वेगवेगळ्या झोननुसार स्पर्धा ठेवण्यात आली. पश्‍चिम झोनमधील सहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होता. यामध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. 

यामध्ये कणकवली नगरपंचायत आणि वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छतेमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी केली. यात ओला, सुका कचर्‍याचे वर्गीकरण, प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदीबाबत जनजागृती, कचर्‍यापासून कंपोष्ट खत प्रकल्प, शहरांची स्वच्छता, रंगरंगोटी अशी विविध कामे करण्यात आली. यामध्ये शहरातील नागरिक, शालेय विद्यार्थी, संस्था, लोकप्रतिनिधी अशा सर्व घटकांना सामावून घेण्यात आले.  जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या स्वच्छ शहर सर्व्हेक्षणांतर्गत केंद्राची टीम मूल्यमापनासाठी आली होती. या टीमने पहिल्या भेटीत सर्व डॉक्युमेंटची तपासणी केली. दुसर्‍या भेटीत प्रत्यक्ष कामांची तपासणी केली आणि लोकांशीही संवाद साधत त्यांच्यामध्ये कितपत जनजागृती झाली आहे याचाही आढावा घेतला.

कणकवलीचे तत्कालीन मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी तत्कालीन पदाधिकारी, नगरसेवकांच्या सहकार्याने कणकवली शहरात स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला होता. स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबविली होती. शहरवासीयांना स्वच्छ शहर मोहीमेत सहभागी करून घेतले होते. स्वच्छतेचे अ‍ॅपही तयार करण्यात आले होते. अखेर नगरपंचायतीने घेतलेल्या या उपक्रमाला चांगले यश आले. 

महाराष्ट्रातील पाचगणी नगरपरिषदेला यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून शिर्डी नगरपरिषदेने तृतीय क्रमांक मिळविला आहे. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले नगरपरिषदेला शंभर शहरांमध्ये 18 वा क्रमांक मिळाला असून 2930 गुण मिळाले आहेत. तर कणकवली नगरपंचायतीला 36 वा क्रमांक मिळाला असून 2853 गुण मिळाले आहेत. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना 25 कोटी, त्यानंतर पंधरा क्रमांकापर्यंतच्या शहरांना 15 कोटी आणि 15 ते 50 क्रमांकापर्यंतच्या शहरांना प्रत्येकी 5 कोटींचे बक्षीस मिळणार आहे. या यशाबद्दल कणकवली नगरपंचायतीचे  आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, तत्कालीन मुख्याधिकारी अवधुत तावडे व कर्मचारी तसेच नागरिकांचेही अभिनंदन होत आहे.