Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Konkan › भक्तांच्या मांदियाळीत कनकनगरी झाली भालचंद्रमय (व्हिडिओ)

भक्तांच्या मांदियाळीत कनकनगरी झाली भालचंद्रमय (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांचा 40 वा पुण्यतिथी दिन रविवारी हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तांच्या मांदियाळीत आणि भालचंद्रबाबांच्या जयघोषात साजरा झाला. ‘दिगंबरा दिगंबरा, भालचंद्र बाबा दिगंबरा’ अशा जयघोषात सायंकाळी कणकवली शहरातून काढण्यात आलेल्या भालचंद्र महाराजांच्या पालखीच्या भव्य मिरवणुकीने कनकनगरी दुमदुमून गेली. रविवारी रात्री उशिरा झालेल्या दशावतारी नाट्यप्रयोगाने भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता झाली. 

गेल्या बुधवारपासून भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ झाला. या प्रत्येक दिवशी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आणि देशविदेशातून भालचंद्र बाबांच्या भक्तगणांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. पहाटेच्या काकड आरतीपासूनच महाराजांचा संस्थान परिसर गजबजून जात असे तो रात्री उशिरापर्यंत तसाच माहोल असे. रविवारी नियमित धार्मिक कार्यक्रमांबरोबरच समाधीस्थानी पंचामृताभिषेक करण्यात आला. तत्पूर्वी नूतन भक्तनिवासाचा शिलान्यास सोहळा पार पडला.  

भाविकांचा उसळला जनसागर

बाबांच्या या मुख्य उत्सवाला रविवारीही भाविकांचा जनसागरच उसळला होता.दुपारच्या आरतीला तर मोठी गर्दी झाली होती. समाधी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येने भाविकांनी समाधी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे, उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्या समवेत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बाबांच्या पालखी मार्गावर शहरात पटकीदेवीपासून तेलीआळी मार्गे शिवाजीचौक तेथून महामार्गाने पटवर्धन चौक, बाजारपेठ मार्गे पुन्हा संस्थान अशा ठिकठिकाणी  णकवलीकरांनी सडारांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी भक्तगणांसाठी अल्पोपहाराची सोयही करण्यात आली होती. बाबांच्या प्रतिमा, मूर्तीसमोर आकर्षक रोषणाई करण्यात आली. तसेच बाबांचा जयघोष करणारी सुमधूर भक्तिगीते लावण्यात आली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोलताशांच्या गजरात भालचंद्र बाबांच्या नामाचा जयघोष करत सायंकाळी साडेपाच वाजता प्रारंभ झालेली ही मिरवणूक रात्री उशिरा संस्थानमध्ये पोहोचली. 

भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी उत्सव भाविक भक्तांसाठी चैतन्याची, मांगल्याची अनुभूती देणारा ठरला. या महोत्सवात चार दिवस नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आणि भजनीबुवांची भजने झाली. भालचंद्र महाराजांच्या सर्व भक्त मंडळींनी आपापल्यापरीने या उत्सवात बाबांच्या चरणी तन-मन-धन अर्पण करून आपली सेवा अर्पण केली. बाबांच्या प्रत्येक उत्सवाला भक्तांच्या गर्दीचा उच्चांक होत आहे.