Thu, Jul 18, 2019 06:31होमपेज › Konkan › प. पू. भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवासाचा शिलान्यास

प. पू. भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवासाचा शिलान्यास

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली  शहर वार्ताहर  

  कणकवलीवासियांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी पुणे, मुंबई, गोवा अशा ठिकाणाहून हजारो भक्तगण कणकवलीत दाखल होत असतात.  दूरवरून येणार्‍या या भक्तांसाठी  संस्थांनच्या भक्तनिवासाची  जागा अपुरी पडत आहे. येणार्‍या भक्तांसाठी  सुसज्ज असे भक्तनिवास बांधावे असा संस्थानचा मानस आहे. त्या अनुषंगाने  ज्या जागी बाबा बसायचे त्या घुमटी शेजारील जागेत हे भव्यदिव्य भक्तनिवास उभारण्यात येत असल्याचे संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी सांगितले . 

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या  40 व्या  पुण्यतिथी दिवशीचे औचित्य साधून नूतन भक्तनिवास शिलान्यास सोहळा रविवारी माऊली महाराज वाळूंजकर (रा.पिंपरी- पुणे) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सचिव अशोक सापळे, खजिनदार दादा नार्वेकर,सदस्य सदानंद बांबुळकर, राजाराम बारसकर , मुरलीधर नाईक, निवृत्ती धडाम, भाई खोत, प्रसाद अंधारी, बाळा सापळे, व्यवस्थापक विजय केळुसकर, ठेकेदार प्रणव कामत   आदी मान्यवर, भाविक-भक्तगण  उपस्थित होते .

श्री.कामत म्हणाले, गतवर्षी जानेवारी महिन्यात भालचंद्र बाबांच्या  जयंती उत्सवावेळी संस्थानने दोन उद्दिष्टे ठेवली होती. त्यातील एक म्हणजे 1 एप्रिलपासून भालचंद्र मठ हे संस्थान या नावाने ओळखले जावे. तर दुसरे भक्तंसाठी सुसज्ज असे भक्तनिवास उभारणे. मठाचे नामकरण व्हावे याबाबत  शासकीय परवानगीसाठी अनेक अडचणी तसेच किमान पाच वर्षे या कामाला लागतील असे सांगण्यात येत होते. परंतु बाबांच्या आशीर्वादाने  पाच वर्ष लागणारे हे काम अवघ्या 5 महिन्यातच झाले.

भक्तनिवासासाठी काशीबाई कणकवलकर व कुटुंबीयांनी आपली जागा संस्थानच्या नावे दान केली. यामुळेच ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण होत असून पुढील 15 महिन्यात सुसज्ज असे काशीभवन नावाचे भक्तनिवास उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. माऊली महाराज वाळूंजकर यांचा सत्कार करण्यात आला. तर जागा दान केल्याबद्दल गौरव कणकवलकर, कैलास चव्हाण, सूर्यकांत बांबूळकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय केळुसकर यांनी केले. सूत्रसंचालन गजानन उपरकर व बाळू वालावलकर यांनी केले .