Fri, Apr 26, 2019 02:08होमपेज › Konkan › जेलभरोसाठी हजारो मराठा एकवटले

जेलभरोसाठी हजारो मराठा एकवटले

Published On: Aug 09 2018 10:27PM | Last Updated: Aug 09 2018 9:47PMकणकवली : वार्ताहर

एक मराठा, लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करत कणकवलीत हजारो मराठा बांधव  जेलभरो आंदोलनात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेल्या रॅलीत महिला, युवकांसह मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा आंदोलकांच्या घोषणांनी कणकवली शहर दणाणून गेले होते. पोलिसांना गुलाबपुष्प देत शांततेत जेलभरो आंदोलन करण्यात आले. 
आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या जेलभरो आंदोलनासाठी गुरूवारी सकाळी 10 वा. पासून मराठा बांधव कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊ लागले. गटागटाने तालुक्यातील फोंडा, तळेरे विभागातील मराठा बांधव जोरदार घोषणा देत सहभागी होत होते. मराठा बांधवांकडून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना गुलाबपुष्प देऊन आपले आंदोलन शांततेने होणार असल्याचा संकेत देण्यात आला. त्यानंतर शहिद जवान कौस्तुभ रावराणे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दु. 12 वा. रॅलीला सुरूवात करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी व भगवे झेंडे घेऊन रॅलीत सहभागी झालेले मराठा बांधव पोलिस स्टेशनच्या दिशेने रवाना झाले. 

महामार्गावरून आप्पासाहेब पटवर्धन चौकमार्गे रॅली पोलिस स्टेशनवर पोहोचली. मराठा बांधवांच्या घोषणांनी कणकवलीचे पोलिस ठाणे दणाणून गेले होते. रॅलीत आ. नितेश राणे, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, ज्येष्ठ नेते एस. टी. सावंत, लवू वारंग, अ‍ॅड. हर्षद गावडे, सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, सौ. सायली सावंत, सौ. प्रणिता पाताडे, सुरेश सावंत, सोनू सावंत, भाई परब, सुशांत नाईक, सुशील सावंत, शैलेश भोगले, बबलू सावंत आदींसह हजारो बांधव सहभागी झाले होते. 

मराठा बांधवांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे जेलभरो आंदोलन होत आहे. आंदोलन शांततेत पार पाडत सिंधुदुर्गातील मराठा बांधवांनी आपला वेगळेपणा दाखवू दिला आहे. आंदोलनात हजारो मराठा बांधवांनी सहभागी होत स्वतःला अटक करून घेतले. शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करून मराठा समाजाला न्याय द्यायला हवा. त्याचबरोबर आंदोलनात ज्या मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावे असे आ. नितेश राणे यांनी सांगितले. 

तहसीलदारांना निवेदन 

रॅली पोलिस स्टेशनवर पोहोचल्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन मराठा बांधवांकडून तहसीलदार संजय पावसकर यांना देण्यात आले. हे निवेदन शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार पावसकर यांनी सांगितले. 

आंदोलकांना अटक व सुटका

जेलभरो आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे 1200 मराठा बांधवांना महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 68 अंतर्गत पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कलम 69 अंतर्गत पोलिसांकडून त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलन शांततेत पार पाडल्याबद्दल मराठा बांधवांचे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी आभार मानले. 

चोख पोलिस बंदोबस्त 

जेलभरो आंदोलन असल्याने कणकवली शहरात गुरूवारी सकाळपासून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सकाळी कणकवलीत येऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. निवासी पोलिस उपअधीक्षक दिलीप गुजर, कणकवलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली 9 पोलिस अधिकारी, 175 पोलिस, दंगाकाबू पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.