Tue, Jul 16, 2019 22:21होमपेज › Konkan › पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेचा रास्ता रोको

पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेचा रास्ता रोको

Published On: May 25 2018 11:34PM | Last Updated: May 25 2018 10:08PMकणकवली : शहर वार्ताहर

गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरांत वाढ होत असल्याच्या निषेधार्थ कणकवलीत शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावर पटवर्धन चौकात शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून महामार्ग रोखून धरला. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकार  व इंधन दरवाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सेनेच्या या आंदोलनामुळे  महामार्ग सुमारे 20 मिनिटे ठप्प झाला होता.

उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, विधानसभा प्रमुख शैलेश भोगले, तालुकाध्यक्ष सचिन सावंत, युवासेना जिल्हाध्यक्ष हर्षद गावडे, राजू राठोड, युवा सेना तालुका सचिव अनुप वारंग, नगरसेविका मानसी मुंज, माही परुळेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

गेल्या बारा दिवसांपासून दररोज पेट्रोल, डिझेल दरांत वाढ होत आहे.सध्या  ही वाढ  5 ते 6 रुपये एवढी झाली आहे. याचा फटका सर्वांनाच बसत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. त्याबाबत केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.   हातात भगवे झेंडे घेत पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे, कहा गये अच्छे दिन कहा गये, दरवाढ करणार्‍या भाजप सरकारचा निषेध असो, रद्द करा रद्द करा पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द करा, कोण म्हणतो रद्द करणार नाही, रद्द केल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.  या मोर्चामध्ये बाळू मेस्त्री यांनी सायकल चालवत दरवाढीचा प्रतिकात्मक निषेध केला. मोर्चा महामार्गावरून कणकवली पटवर्धन चौकात पोहोचल्यावर शिवसैनिकांनी  महामार्गावर ठिय्या मांडत महामार्ग रोखून धरला.

यापुढे तीव्र आंदोलन छेडू 

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांत तर पेट्रोल, डिझेलच्या दरात चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ नागरिकांना परवडणारी नाही. राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला जाग आणण्यासाठी व पेट्रोल, डिझेलची दरवाढ थांबविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले असून यापुढे ही दरवाढ न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. वैभव नाईक यांनी दिला.

 बाळू पारकर, प्रमोद मसुरकर, सुजित जाधव, संजय पारकर, भूषण परूळेकर, बाळू मेस्त्री, योगेश मुंज, रूपेश आमडोसकर, मंदार परूळेकर, शरद सरंगले. ललित घाडीगांवकर, गोट्या कोळसुलकर, आनंद आचरेकर, साक्षी आमडोसकर, हेलम कांबळे,  वैदेही गुडेकर, लक्ष्मण घाडीगावकर सुमारे 15 ते 20 मिनिटे शिवसैनिकांनी महामार्ग रोखून धरल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलिस व्हॅनमध्ये भरून पोलिस स्थानकात आणले. त्यानंतर आंदोलकांवर  प्रतिबंधात्मक कारवाई  करून सोडण्यात आले.