Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Konkan › सार्वजनिक बांधकाममंत्री आज पुन्हा करणार महामार्गाची पाहणी

सार्वजनिक बांधकाममंत्री आज पुन्हा करणार महामार्गाची पाहणी

Published On: Sep 07 2018 10:19PM | Last Updated: Sep 07 2018 9:47PMकणकवली : प्रतिनिधी

गणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर चाकरमानी आणि गणेशभक्तांचा मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी महामार्गासह कोकणातील रस्ते खड्डे मुक्त करण्याचे निर्देश आठवड्यापूर्वी सिंधुदुर्ग दौर्‍यावर आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्याचवेळी केलेल्या घोषणेनुसार ना. चंद्रकांत पाटील हे शनिवार 8 सप्टेंबर रोजी लांजा ते कणकवली आणि कणकवली ते झाराप दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. मंत्र्यांच्या या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री वारंवार जिल्हा दौर्‍यावर येवोत अशी अपेक्षा जिल्हावासियांकडून व्यक्त होत आहे.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा मोठा उत्सव. या सणासाठी अर्धीअधिक मुंबई कोकणात दाखल होते. कारण कोकणवासिय मोठ्या संख्येने नोकरी धंद्यानिमित्त मुंबईसह अनेक भागात स्थिरावले आहेत. या काळात कोकणातील प्रत्येक घराघरात चाकरमानी येतातच येतात. जरी कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांनी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येत असले तरी एसटी बसेस, खासगी बसेस, आरामगाड्या या माध्यमातूनही चाकरमानी मंडळी मोठ्याप्रमाणात येतात. गेल्या दीड-दोन वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या चौपदरीकरणामुळे जुना महामार्ग खड्डेमय झाल्याने चाकरमान्यांसह कोकणवासियांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे केवळ महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची मंत्रालयात या महामार्गाच्या दुरूस्तीची आढावा बैठक घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे थांबले नाहीत तर आठवड्यापूर्वी त्यांनी स्वतः सायन ते ओरोस असा महामार्गाने प्रवास करत महामार्गाची पाहणी केली. आठवडाभरात मुंबई-गोवा महामार्गासह राज्य, जिल्हा आणि ग्रामीण मार्ग खड्डेमुक्त झाले पाहिजेत असे स्पष्ट निर्देश ना. पाटील यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले होते. याचवेळी त्यांनी आठवडाभरानंतर आपण पुन्हा सिंधुदुर्गात महामार्गाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची घोषणा केली होती. 

खरेतर मंत्र्यांच्या सर्वच घोषणा खर्‍या असतात असे नाही, मात्र ना. पाटील यांनी घोषणप्रमाणे आपला कोकण दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी त्यांनी मुंबई ते लांजा दरम्यान महामार्गाची पाहणी केली आणि शनिवारी सकाळी 11 ते दु. 1 या दरम्यान लांजा ते कणकवली आणि दु. 2 ते सायंकाळी 5 या दरम्यान महामार्गाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते कणकवली आणि सावंतवाडी येथे अधिकार्‍यांची आढावा बैठकही घेणार आहेत. 

एकूणच ना. पाटील यांच्या या दौर्‍यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या आठ दिवसात महामार्गासह राज्य, जिल्हा, ग्रामीण मार्गांच्या खड्डेमुक्तीचे काम हाती घेतले होते. 

पावसानेही मधल्या कालावधीत विश्रांती घेतल्याने खड्डे भरण्याच्या कामाला गती आली. ना. पाटील यांच्या दौर्‍यामुळ का होईना महामार्ग तुर्तास तरी खड्डेमुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. 
आघाडी शासनाच्या काळात अनेक वर्ष छगन भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक  बांधकाम खाते होते. गणेशोत्सव काळात महामार्गासंबंधी ना. भुजबळ अधिकार्‍यांची आढावा बैठक घेत असत. 

 महामार्गाची पाहणी करण्यासाठी  आले नव्हते. परंतू ना. चंद्रकांत पाटील यांनी गतवर्षी आणि यावर्षी स्वतः महामार्गाची कोकणात येऊन पाहणी केली.  त्यामुळे त्यांना वस्तूस्थिती समजली आणि तसे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला कोकणात येणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम दर्जेदार होईल, अशी कोकणवासीयांची अपेक्षा आहे.