Thu, Apr 25, 2019 17:49होमपेज › Konkan › कोकणात रोजगार निर्मितीसाठी वाणिज्य मंत्रालयाची योजना

कोकणात रोजगार निर्मितीसाठी वाणिज्य मंत्रालयाची योजना

Published On: Jul 20 2018 11:24PM | Last Updated: Jul 20 2018 10:21PMकणकवली : प्रतिनिधी

2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेने 5 हजार अब्ज अमेरीकन डॉलर्सचे लक्ष्य ओलांडण्याकरीता जिल्हास्तरावरील सर्व भागधारकांशी चर्चा करून देशातील प्रत्येक जिल्ह्याचे उत्पादन किमान 3 टक्क्याने वाढण्याकरीता केंद्रीय वाणिज्य उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयातर्फे नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी निवडलेल्या देशातील सहा पथदर्शी जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश केला आहे. तसेच या मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार्‍या अपेढा, एम्पेडा, स्पाईस बोर्ड यासारख्या आस्थापनांकडून कोकणसाठी विशेष आराखडे बनविण्यात आले असून त्यांचाही दृष्य परिणाम लवकरच दिसेल असा विश्‍वास ना.प्रभू यांना आहे.

ना.सुरेश प्रभू यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पाठविलेल्या पत्रामध्ये याबाबतची माहिती दिली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या या नव्या योजनेंतर्गत स्थानिक परिस्थितीनुरूप नियोजन, अंमलबजावणी आणि पर्यवेक्षण करण्यासाठी ना.प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची अधिकारीता सुकाणू समिती स्थापन झाली असून जिल्हास्तरावर सर्व विभागांचे प्रतिनिधीत्व असलेली कार्यान्वयन समिती स्थापन करण्यात आली आहे. भारतीय व्यवस्थापन संस्थेतही त्या त्या परिसरातील नावाजलेल्या संस्थांना या नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येत आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयामार्फतसुध्दा लवकरच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून विमानसेवा आणि हवाई माल वाहतूक सेवा सुरू होईल, असा विश्‍वास ना.प्रभू यांनी व्यक्त केला आहे.  

ते पुढेम्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशातील सर्वस्तरातील घटकांकरीता विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या सर्व योजनांचा लाभ कोकणातील जनतेला पुरेपूर मिळावा म्हणून कोकणचा भूमिपूत्र या नात्याने आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील एक सदस्य म्हणून आपण सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. स्थानिक प्रशासनाकडून गेली चार वर्षे आपण व्यक्तिश: या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत आहे. प्रशासनाबरोबरच दशक्रोशीतील संस्थांनासुध्दा या अभियानात सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी आपण प्रयत्न केले असून परिवर्तन केंद्र ही संकल्पना सुरू केली आहे. 

या पूर्वी आपण तत्कालीन राजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसारख्या ग्रामीण भागाची विकास वाहिनी ठरलेल्या योजनेचा राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील शुभारंभ आपण राजापूरमधुन केला होता. केंद्र सरकारच्या योजना संपूर्ण देशाचा विचार करून बनविल्या जात असल्या तरी स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार त्यात काही बदल आवश्यक असतात. कोकणच्या भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक असणारा लोसंख्येचा निकष क्षितील करण्यासाठी आपण पुढाकार घेतला. याशिवाय लोककलाकारांच्या निवृत्ती मानधनाचासाठीही पाठपुरावा केला. आपण गेली साडेतील वर्षे प्रथम रेल्वे आणि आता वाणिज्य उद्योग आणि नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचा मंत्री म्हणून देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचा व विकासाचा विचार करून विविध योजना बनवितानाही कोकणातील जनतेला त्याचा कसा लाभ होईल याचा विचार प्रामुख्याने करत आहे.