Sat, Apr 20, 2019 09:54होमपेज › Konkan › सार्व. बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात मारहाण

सार्व. बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

नागवे ते करंजे जाणार्‍या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबाबतचे निवदेन देण्यासाठी  कणकवलीतील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात गेलेल्या शिवराम अशोक सातवसे (26, रा. नागवे भटवाडी) याच्यासह चौघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिवराम सातवसे यांच्या तक्रारीवरून संजय सावंत, महेंद्र डिचवलकर, सतीश सावंत, संतोष परब व इतर पाच ते सहा अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना शुक्रवारी दु. 12.15 च्या सुमारास घडली. नागवे ते करंजे या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असल्याने दोन दिवसांपूर्वी नागवे येथील तरूणांनी हे काम अडवले होते. याबाबतचे निवेदन देण्यासाठी नागवेतील काही तरूण कणकवली सा. बां. उपविभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी ज्यांच्यावर मारहाणीचा आरोप आहे तेही तेथे पोहचले. दोघांच्यात त्याच विषयावरून शाब्दिक बाचाबाची झाली.

यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेले शिवराम सातवसे, स्वप्निल पाताडे, प्रमोद ढवण, शशिकांत सातवसे (रा. नागवे) यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिवराम सातवसे यांच्या तक्रारीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे करत आहेत. 

स्वाभिमानमधील कुरघोडीतूनच मारहाणीचे षडयंत्र ; प्रमोद जठार 

नागवे येथील रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सतीश सावंत व त्यांच्या सहकार्‍यांनी सा. बां. उपविभागाच्या कार्यालयातच मारहाण केली. केवळ या निवडणुकीत गोंधळ निर्माण व्हावा व स्वाभिमान पक्षाचे आ. नितेश राणे पुरस्कृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांचा पराभव व्हावा, नलावडे यांच्या यशाचे श्रेय आ. नितेश राणे यांना मिळू नये या उद्देशानेच या मारहाणीचे षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

याबाबत नितेश राणे यांनी जाब विचारल्यानंतर सतीश सावंत यांच्या मंडळींनी गुन्हे मागे घ्या, आम्ही माफी मागतो असा आग्रह आमच्या कार्यकर्त्यांकडे धरला होता. निवडणूक शांततेत होत असताना वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न होता. सा. बां. कार्यालयातील एका महिला कर्मचार्‍यालाही मारहाण करण्यात आली. मात्र, त्या महिलेने भीतीने तक्रार दिली नाही. आ. नितेश राणे व सतीश सावंत ग्रुपच्या कुरघोडीच्या राजकारणातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला.  कणकवली निवडणुकीतील वातावरण शांत असताना असे प्रकार करून ते बिघडविण्याचा स्वाभिमानचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
 

 

tags ; Kankavali,news, construction, sub,divisional, office, hitting,


  •