Sat, Jun 06, 2020 20:26होमपेज › Konkan › कणकवली मतदारसंघ हा राणे यांचा बालेकिल्ला

कणकवली मतदारसंघ हा राणे यांचा बालेकिल्ला

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:15PM
कणकवली : गणेश जेठे

गेल्यावेळी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे विनायक राऊत यांना मोठे मताधिक्य मिळाले असताना कणकवली, देवगड आणि वैभववाडीत या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात मात्र त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार नीलेश राणे यांना अधिकची मते मिळाली होती. गेल्या अनेक निवडणुकांचा इतिहास पाहता कणकवली हा भाग राणे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नितेश राणे हे 25 हजार 979 इतके मोठे मताधिक्य घेवून निवडून आले होते. आता 2019 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही कणकवली विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे कोणती स्ट्रॅटेजी राबविणार? आणि हा बालेकिल्ला राखणार का? या प्रश्‍नांची उत्तरे जसजशी निवडणूक जवळ येईल, तशी मिळण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीत जरी भाजप, शिवसेनेची युती झाली तरी विधानसभा निवडणुकीत मात्र भाजप, शिवसेनेची युती होईल असे वाटत नाही. गेल्या निवडणुकीप्रमाणेच पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही शिवसेना, भाजप एकमेकाविरोधात लढतील आणि निवडणूक निकालानंतर निवडून आलेल्या आमदारांना एकत्र करून सत्तेसाठी युती करतील अशीच शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना, भाजपमधील इच्छूक उमेदवारांनी आतापासूनच निवडणूकपूर्व तयारी सुरू केलेली दिसते. 

कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार करता ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या बदल झाला आहे. कणकवलीमध्ये जि.प. पं.स. निवडणुकांमध्ये राणे समर्थकांनी मोठे यश मिळविले असले तरी वैभववाडी, देवगड या पंचायत समित्या आणि जि.प.च्या अनेक जागा शिवसेना, भाजपने जिंकल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात प्रमुख चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.

काँग्रेसकडून विद्यमान आमदार नितेश राणे पहिल्यांदा या निवडणुकीत उतरले होते. तत्पूर्वी आमदार असलेल्या भाजपच्या प्रमोद जठार यांच्याशी त्यांची लढत झाली होती. विशेष म्हणजे मोदी लाटेच्या काळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासार्डेच्या माळारानावर येवून प्रमोद जठार यांच्यासाठी प्रचाराची जाहीर सभा घेतली. या सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. परंतु जठार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. आ. नितेश राणे यांना एकूण 74 हजार तर प्रमोद जठार यांना 49 हजार मते मिळाली होती. असेही म्हटले जाते की, शिवसेनेने सिध्दिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर यांना कणकवलीतून निवडणूक रिंगणात उतरविले नसते तर जठार निवडून आले असते. परंतु प्रत्यक्षात सुभाष मयेकर यांना 12 हजार मते मिळाली. या मतांची संख्या पाहता जठार यांना पर्यायाने भाजपला ती निवडणूक कणकवली मतदारसंघात कठीणच होती. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत अतुल रावराणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते.  त्यांना 8 हजार मते मिळाली होती. अतुल रावराणे हे आता भाजपमध्ये कार्यरत आहेत. साखर कारखान्याच्या मुद्यावर माजी आ. विजय सावंत यांनी काँग्रेसशी बंडखोरी करत निवडणूक लढविली होती, पण त्यांनाही या मतदारसंघात केवळ 7 हजार मते मिळाली.  हे मतांचे गणित पाहता राणे यांची या मतदारसंघातील ताकद मोठी होती. तेव्हा राणे काँग्रेसमध्ये होते. आता मात्र, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची निर्मिती झाली आहे. आ. नितेश राणे सद्या काँग्रेसचे आमदार असले तरी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार असणार हे निश्‍चित आहे.  प्रमोद जठार हे देशात आणि महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या आणि सद्या फॉर्ममध्ये असलेल्या भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आहेत. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असणार की नाहीत असा एक प्रश्‍न विचारला जातो. परंतु एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजपकडून पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळेल अशीच शक्यता आहे. सध्या ते जिल्ह्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच विविध प्रश्‍न सोडविण्यासाठीही  प्रयत्न करत आहेत. 

अर्थात अतुल रावराणे हेही भाजपमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असतील असे सांगितले जाते. राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष नेमका कोणाला उमेदवारी देणार याचीही उत्सुकता आहेच. ऐनवेळी मात्र इतर पक्षातील इच्छूक काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहेच. तरीही माजी आ.विजय सावंत हे सध्या काँग्रेसमध्ये कार्यरत असल्याने काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळेल असाही अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. शिवसेनेने गेल्या निवडणुकीत सुभाष मयेकर यांना कणकवलीतून निवडणूक रिंगणात उतरवले, ते नवखे उमेदवार असूनही त्यांना 12 हजार मते मिळाली. याचा अर्थ शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात मतदार या मतदारसंघात आहे. गेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वैभववाडी आणि देवगड या दोन तालुक्यात शिवसेनेचे मतदार वाढले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर हे देवगड तालुक्याचे सुपूत्र असून शिवसेनेने त्यांना निवडणुकीची तयारी करण्यास सांगितल्याची चर्चा आहे. सध्या दुधवडकर हे या मतदारसंघात विविध उपक्रम राबवून निवडणूकपूर्व तयारी करत असल्याचे चित्र आहे. 

एकूणच कणकवली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही बहुरंगी होणार आहे हे निश्‍चित आहे. त्यादृष्टीने आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. कणकवली नगरपंचायत निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे. ही निवडणूक म्हणजे विधानसभा निवडणुकीची कणकवलीतील रंगीत तालिम असणार आहे. त्यामुळे कणकवलीच्या निकालावरही पुढील राजकारणाचे संकेत अवलंबून आहेत.