Wed, Jul 24, 2019 06:03होमपेज › Konkan › सेवा समाप्तीमुळे १६० एसटी कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड

सेवा समाप्तीमुळे १६० एसटी कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड

Published On: Jun 20 2018 10:34PM | Last Updated: Jun 20 2018 10:09PMकणकवली : प्रतिनिधी

8 व 9 जून रोजी कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या चालक कम वाहक, सहाय्यक व अनुकंपा तत्वावर लागलेल्या राज्यातील जवळपास 1100 कामगारांवर सेवा समाप्तीची कारवाई एसटी महामंडळाने केली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग विभागातील 160 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार असून सिंधुदुर्ग विभागाच्या दैनंदिन वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मंगळवारी जवळपास 85 फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे काही वस्तीच्या गाड्याही जावू शकल्या नाहीत. बुधवारीही त्याचा परिणाम कामकाजावर झाला. दरम्यान ही कारवाई मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा एसटी कामगार संघटना आणि इंटकने दिला आहे.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घोषीत केलेल्या वेतन करारावर नाराज होवून संपूर्ण राज्यभरात एसटी कामगारांनी कामबंद केले होते. यामध्ये नवीन लागलेल्या कामगारांनी सहभाग घेतला होता. महामंडळाने त्यांच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली होती. नंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी झालेल्या चर्चेअंती एसटी कामगारांनी संप मागे घेतला. त्यावेळी ना. रावते यांनी कर्मचार्‍यांवरील कारवाई गंभीर गुन्हे वगळता मागे घेण्याची ग्वाही दिली होती. दरम्यानएसटी कर्मचार्‍यांसह पुन्हा कामावर हजर झाले होते. नवीन लागलेल्या कामगारांना कामही देण्यात आले होते. असे असताना पुन्हा एकदा एसटी महामंडळाने मंगळवारी दूरध्वनीवरून आदेश देवून कामबंद आंदोलनात सहभागी नवीन कामगारांची सेवा समाप्त करण्याच्या सूचना दिल्या. 

त्यानुसार सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांनीही सिंधुदुर्गातील अशा 160 कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली. अघोषित संपात सहभागी झाल्याने महामंडळाचे उत्पन्न बुडाले आणि प्रवाशांची गैरसोय झाली. एसटी महामंडळाची प्रतिमा डागाळण्यास कारणीभुत असल्याचा ठपका ठेवून त्या कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करत असल्याची नोटीस विभाग नियंत्रकांमार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासूनच सिंधुदुर्गातील एसटीच्या शेड्युलवर परिणाम झाला. अनेक फेर्‍या रद्द झाल्याने जवळपास साडेचार हजार कि.मी. रद्द झाले. बुधवारीही त्याचा फटका बसला. 

याबाबत सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठांच्या आदेशानुसार 160 कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र दैनंदिन शेड्युलवर याचा परिणाम झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. उन्हाळी हंगामात सुरू केलेल्या जादा फेर्‍या आता रद्द झाल्याने उपलब्ध कर्मचार्‍यांच्या माध्यमातून प्रवाशांना सुरळीतपणे सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले. एसटी कामगार नेते दिलीप साटम व इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे यांनी एसटी महामंडळाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीच्या कारवाईमुळे सिंधुदुर्ग विभागाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले. महामंडळाने ही कारवाई मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही ते म्हणाले.

...तर कामगार संघटना न्यायालयात जाणार 

प्रशासनाकडून करण्यात आलेली ही कारवाई नियमबाह्य असून शिस्त व अपील कार्यपध्दतीचा भंग करणारी आहे. प्रशासनाने अशी कृती करून अनुचित कामगार प्रथेचा अवलंब केला आहे. प्रशासनाच्या या कृतीबाबत कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून कामगारविरोधी कारवाई त्वरीत थांबविली नाही तर प्रशासनाच्या या कृतीविरोधात मान्यताप्राप्त संघटनेने बोलविलेल्या तातडीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आंदोलनात्मक भुमिका ठरविली जाईल. त्याचप्रमाणे या कृतीबाबत प्रशासनाने अनुचित कामगार प्रथेचा अवलंब केल्याबाबत संघटना न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी म्हटले आहे.

इंटक संघटनेकडून फतव्याचा निषेध

अघोषित बंद कालावधीतील सहभागी कर्मचार्‍यांवर सूडबुध्दीने सेवा खंडीत करण्याचा जो तुघलगी जो फतवा प्रशासनाने काढला आहे, त्या हुकुमशाही निर्णयाचा जाहीर निषेध करत असल्याचे एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी म्हटले आहे. 

इंटक संघटना राज्यातील अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. इंटक संघटना ही मुजोरशाही खपवून घेणार नाही. कर्मचार्‍यांनी घाबरू नये. कुणाचीही सेवा खंडीत होवू देणार नाही. कुठल्याही दहशतीला बळी पडू नये, ीअसे आवाहन इंटकच्यावतीने करण्यात आले आहे.